पुणे: महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरुन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडे असलेल्या रोल्स रॉईस कारबद्दल मात्र कोरटकर काहीही माहिती द्यायला तयार नाही. एवढी महागडी गाडी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. प्रशांत कोरटकरच्या आलिशान आणि वादग्रस्त रोल्सरॉईस गाडीचा शोध पोलीस घेत आहेत. पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉईस गाडी असल्याचं समोर आलं आहे. तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवर ही गाडी असल्याचं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडीओमधून दिसून येतं आहे. WB-02-AB123 या क्रमांकांच्या या रोल्स रॉईससोबत तुषार कलाटे यांचे फोटो देखील आहेत. तर दुसरीकडे कलाटे यांनी ही कार त्यांच्याकडे आहे हे मान्य केलं आहे. त्यांनी ती एका बँकेच्या लिवालामध्ये विकत घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही कार कलाटे यांच्याकडे कशी आली याची माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे.
ते म्हणाले ही रोल्स रॉईस कार प्रशांत कोरटकरची नाही तर ती माझी आहे. ही कार मी 2017 रोजी घेतलेली आहे आणि ती माझीच आहे. प्रशांत कोरटकर हे तीन ते चार महिन्यांपूर्वी माझ्याकडे माझ्या एका मित्रासोबत आला होता, त्यावेळी आमची ओळख झाली. कोरटकर पत्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं. गाडी पाहून कोरटकर म्हणाले, मी त्या गाडीसोबत एक फोटो काढू का? मी म्हटलं काढा. काही हरकत नाही. त्याच्या व्यतिरीक्त माझा त्याच्याशी काहीही कसलाही लांबपर्यंत संबंध नाही.
ही गाडी कलाटेंकडे कशी आली?
2016 मध्ये मी ही कार बीएमडब्लू फायनान्सकडून घेतला आहे. मी त्याची कागदपत्र सीआयडीला 2018 जमा केलेली आहेत. 2018मध्ये याबाबत माझी चौकशी देखील झाली होती. त्यावेळी ती मी कशी घेतली, पैसे कसे दिले त्याबाबतचा सर्व जबाब मी त्यांना दिलेला आहे. मी ही कार विकत घेताना ती चार हजार सातशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे याबाबतची काही कल्पना मला नव्हती, अशी माहिती यावेळी तुषार कलाटे यांनी दिली आहे. मला गाड्याची आवड असल्यामुळं मी ही कार घेतली होती. बॅक देत असल्याने मी विश्वासाने ही कार घेतली होती.
ही कार अद्याप समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर असण्याचं कारण म्हणजे याची सीबीआयकडे केस सुरू असल्याने आत्तापर्यंत ती नावावरती होऊ शकलेली नाही. त्याचे एनओसी, सर्व कागदपत्रे, पुरावे सर्व माझ्याकडे आहेत. मला ही गाडी कोणाच्या नावावर होती ते माहिती नाही. ती माहिती देणं फायनान्स करणाऱ्या कंपनीचं काम आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
माझे कोरटकरशी काहीही संबंध नाही
माझे कोरटकरशी काहीही संबंध नाहीत, तो माझ्या एका मित्रासोबत ते तीन ते चार महिन्यांपुर्वी आला होता, मी कार्यक्रमाला जाण्यासाठी ती गाडी आणली होती. जेव्हा ते माझ्या मित्रासोबत माझ्या घरी आलेले तेव्हा ते म्हणाले, हे कोरटकर पत्रकार आहेत. ते बोलले एक कारची चक्कर मारली, त्याचा एक रील काढला आणि फोटो काढले त्याव्यतीरिक्त माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, अंसही त्यांनी म्हटलं आहे.
माहूर गडावरील व्हिडिओबाबत ते काय म्हणाले?
माहूर गडावरती मी गेलो होतो. मी ते नाकारत नाही. मनोहर भोसले, माझे गुरू असल्यामुळं मी त्यांना गुरूस्थानी मानतो. मी त्यांच्याबरोबर माहूर गडावरती गेलो होतो. मनोहर भोसले आणि प्रशांत भोसले यांचे काय संबंध आहेत त्याची मला माहिती सांगता येणार नाही. मी सर्व चौकशीसाठी तयार आहे, असंही तुषार कलाटे म्हणालेत.