Rohit pawar rap song : आमदार रोहित पवार यांंचं  'महाराष्ट्र व्हिजन फोरम'चं रॅप सॉंग सध्या चांगलंच गाजत आहे. अनेक तरुण हे रॅप सॉंग शेअरदेखील करताना दिसत आहे. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अश्लील भाषेतील रॅप सॉंगचं शुटींग करणाऱ्या रॅपरकडूनच हे गाणं रोहित पवार यांनी गाऊन घेतलं आहे. एकीकडे या रॅपरवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी संघटना आक्रमक झाली असताना आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीदेखील शुभम जाधववर संताप व्यक्त केला असताना त्यांच्याचकडून  महाराष्ट्र व्हिजन फोरमचं तरुणांना नवी उमेद देणारं गाणं गाऊन घेतलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.


महाराष्ट्रातील युवक-युवतींना एकत्रित आणून राज्याच्या भविष्याच्या धोरण निर्मितीमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र व्हिजन फोरम ही एक प्रभावी युवा चळवळ सुरु केली आहे. युवांना त्यांच्या राज्याच्या विकासाबद्दल असलेल्या अपेक्षा या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवता येत आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये महाविद्यालयात जाऊन आमदार रोहित पवार हे तरुणाईशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना अगदी मनमोकळी उत्तरे देखील देत आहेत. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक युवांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. तरुणाईच्या सध्याच्या काळातील ट्रेन्ड लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र व्हिजन फोरम युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाचे रॅप सॉंग लॉन्च केलं आणि अल्पावधीतच ते व्हॉट्सॲप आणि इतरही समाज माध्यमांवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.  हेच रॅप सॉंग शुभमने गायलं आहे. 


कोण आहे शुभम जाधव?



शुभम जाधव हा रॅपर आहे. रॉक्सन नावाने तो प्रसिद्ध आहे मात्र त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आणि ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे त्याने अश्लील भाषेतील रॅपचं शूटिंग केल्याच समोर आलं होतं.  ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून आणि समोरच्या टेबलवर दारुची बाटली ठेवून शुभम जाधव नावाच्या रॅपरने हे रॅप सॉंग शुट केलं होतं . त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातील व्यक्तींकडून शुभमला हे रॅप सॉंग तयार करण्यासाठी मदत करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी विद्यापीठाच्या बड्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली होती. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत तक्रार दिली होती.  त्याने केलेल्या या कृत्यामुळे प्रशासनाने संताप व्यक्त केला  होता. 



'त्या' प्रकरणावेळी अजित पवार संतापले मग आता...


शुभम जाधवचं रॅप सॉंग ऐकून त्यावेळी अजित पवार चांगलेच संतापले होते. त्यावेळी त्यांनी शुभमवर कारवाई करण्याची मागणी केली होती. हा सर्व प्रकार अत्यंत निंदनीय असून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारा आहे. या संदर्भात चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची तसेच विद्यापीठाने एक चौकशी समिती नियुक्त केल्याची माहिती मिळाली आहे. पण या घटनेची शासन स्तरावर सुद्धा दखल घेण्याची आवश्यकता आहे”, असं अजित पवार म्हणाले होते.