Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
Rohit Pawar MPSC Student Protest: जवळपास 10 दिवसांपासून रोहित पवार आणि त्यासोबतच एमपीएससीचे हे विद्यार्थी एस एम जोशी पुलावर आंदोलन करत आहेत.

पुणे : पुण्यामधल्या एमपीएससीच्या आंदोलकांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांच्यावरती पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही, त्यामुळे पोलीस (Rohit Pawar MPSC Student Protest) जाणीवपूर्वक आयोजकांना त्रास देत आहेत असा दावा करत रोहित पवार यांनी केला आहे. तर याबाबतचा जाब विचारण्यासाठी रोहित पवारांनी विश्रामबाग पोलीस ठाणं गाठलं. गेल्या नऊ दिवसांपासून पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू असून आजचा या आंदोलनाचा दहावा दिवस आहे आणि सध्या रोहित पवार आक्रमक झाले आहेत, तर पुण्याच्या पोलीस आयुक्तांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे.(Rohit Pawar MPSC Student Protest)
पोलिसांनी इतक्याही लाजा विकू नये, मुख्यमंत्री महोदय आपल्या विभागातील बिनडोक अशा पोलिसांवर कारवाई करावी, गोरगरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना दहशतवादी आणि गुप्तहेर ठरवलं जातंय, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे, तर एमपीएससी विद्यार्थ्यांवर काल गुन्हा दाखल झालेला होता, मात्र त्यामध्ये रोहित पवारांच नाव नव्हतं आणि त्यामुळे आता रोहित पवार आक्रमक होत थेट सोशल मिडीया पोस्ट केली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांचं डोक ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. रोहित पवार यांची मागणी आहे की त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जावा. पोलिसांनी ज्या प्रकारे विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला त्याप्रकारेच माझ्यावरही गुन्हा दाखल करा अशी रोहित पवारांची मागणी आहे. जवळपास 10 दिवसांपासून रोहित पवार आणि त्यासोबतच एमपीएससीचे हे विद्यार्थी एस एम जोशी पुलावर आंदोलन करत आहेत.(Rohit Pawar MPSC Student Protest)
रोहित पवारांनी याबाबत एक सोशल मिडीया पोस्ट केली आहे, त्यात म्हटलंय, पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची मुलं, महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांना आतंकवादी, दहशतवादी आणि गुप्तहेर म्हणणाऱ्या पुणे पोलिसांचा जाहीर निषेध! इतक्याही लाजा विकू नका..! मुख्यमंत्री महोदय, आपल्या विभागातील बिनडोक अधिकाऱ्यांना थोडी समज द्या… भ्रष्ट मित्रासाठी गोरगरीब युवा पिढीला कशाला बदनाम करता? असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची मुलं, महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांना आतंकवादी, दहशतवादी आणि गुप्तहेर म्हणणाऱ्या पुणे पोलिसांचा जाहीर निषेध! इतक्याही लाजा विकू नका..! मुख्यमंत्री महोदय, आपल्या विभागातील बिनडोक अधिकाऱ्यांना थोडी समज द्या… भ्रष्ट मित्रासाठी गोरगरीब युवा पिढीला कशाला बदनाम करता? @Dev_Fadnavis #PunePolice
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 10, 2026
रोहित पवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, "एक तर मी जसं मगाशी म्हटलं की मित्राचा विचार करून, मुख्यमंत्री साहेब, या लाखो विद्यार्थ्यांवर आणि पोलिसांचा वापर करून विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते, एफआयआर केले जातात. आता मी तिथे २४ तास, १० दिवस झाले मी तिथे बसून सगळ्यात जास्त आक्रमक मी बोलतो आणि मग मी तिथे आक्रमक एवढा बोलत असेल, तर या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे कारण काय? माझ्यावर करा. मी या पोलिसांना म्हणणार आहे की, आम्ही तिथे असताना आणि मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की, माझ्यावर कारवाई करा, विद्यार्थ्यांवर करू नका, विद्यार्थ्यांचे भविष्य तुम्ही अडचणीत आणाल. पण तरीसुद्धा विद्यार्थ्यांवर कारवाई केली, दुसऱ्यांदा म्हणजे काल १५ लोकांवर कारवाई केली, आज परत त्यातल्याच काही चार लोकांवर दुसरी कारवाई केली की ड्रोन उडवला. आता आम्ही विचारायला आलेलो आहे की, मी तर नागरिक आहे, लोकप्रतिनिधी हा वेगळा विषय आहे, मी तिथे असेल तर माझ्यावर कारवाई करायला तुम्हाला काय जातं? या सगळ्या ज्या बाकींच्या कारवाई केल्या विद्यार्थ्यांच्या, त्या कॅन्सल करा, सगळे कलम जिथे टाकायचे ते माझ्यावर टाका."





















