Rohini Khadse meets Sharad Pawar: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे शरद पवार आणि रोहिणी खडसे यांच्यात आज काय चर्चा होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, रोहिणी खडसे यांनी आजची भेट ही केवळ पक्षसंघटनेच्या कामाच्यानिमित्ताने होती, असे सांगितले. संघटनेत काही नियुक्त्या करायच्या आहेत, त्यासाठीच मी शरद पवार यांना भेटले, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. त्या शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
प्रांजल खेवलकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, अद्याप खडसे कुटुंबीयांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला नाही. याबाबत रोहिणी खडसे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र मिळून याबाबत चर्चा करु आणि निर्णय घेऊ. त्यानंतर आम्ही जामिनासाठी अर्ज करु, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी याबाबत न्यायालयाबाहेर बोलणं चूक आहे. आम्हाला जी काही बाजू मांडायची आहे, ती आम्ही वकिलांमार्फत कोर्टात मांडत आहोत. मलाही जी काही बाजू मांडायची असेल ती योग्य ठिकाणी आणि योग्यवेळी मी मांडेन. या प्रकरणाची चौकशी एनडीपीएस कलमांच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे, तसे झाले पाहिजे, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले.
दरम्यान, आज सकाळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता. या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले होते. या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी पुण्यातील मोदीबागेत आज शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, माझ्यावर हल्ला झाला. त्यानंतर बुलढाण्यात पुरुषोत्तम खेडेकर साहेब राहतात तिकडे मराठा सेवा संघाच्या परिवाराची बैठक झाली. संभाजी ब्रिगेड सामाजिक आणि राजकीय लोक आता एकत्र येतील. कारण आम्ही एकाच विचाराने काम करतो. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा आणि समतेच्या एका तत्त्वाने काम करतो. संभाजी ब्रिगेड हा मराठा सेवा संघाचा भाग, जिजाऊ ब्रिगेड आहे, महात्मा फुले इतिहास संशोधक संस्थाही मराठा सेवा संघाचा भाग आहे. मराठा सेवा संघाची ताकद विभागली गेल्यामुळे राजकीय आणि सामाजिक यश मिळत नाही. त्यामुळे आता पुरुषोत्तम खेडेकर साहेब सामाजिक आणि राजकीय संघटना एकत्र आणण्याचा विचार करत आहेत, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले. माझ्यावर हल्ला झाला यामुळे संरक्षण घ्यावं असं साहेबांचं म्हणणं होतं. माझी सुरक्षा करण्यासाठी बहुजन समाज आहे. पण लोकशाहीत एक व्यवस्था असते. त्यामुळे मी आता पोलीस संरक्षण घेतले आहे. जो संषर्घ निर्माण झाला त्याची माहिती साहेबांना दिली, असेही प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
आणखी वाचा