Pune Ganeshotsav 2022: काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav 2022) जय्यत तयारी पुण्यात सुरु आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील रविवार पेठेत आकर्षक मखर उपलब्ध असून ते खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळतं आहे.
रविवार पेठेतील एका मखर विक्रेत्याकडे तर चक्क रिसायकल मखर उपलब्ध आहेत. या वर्षी मखर वापरा आणि पुढच्या वर्षी परत घेऊन या, अशी त्यांची भन्नाट ऑफर आहे आणि त्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या वर्षी या मखरावर 40 टक्के सूटदेखील मिळणार आहे. त्यामुळे पुणेकर या भन्नाट ऑफरला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे.
दरवर्षी बाप्पाला नवा मखर
अनेकांच्या घरात 10 दिवसांचा गणपती असतो. त्या दिवसांमध्ये अनेकदा मखर खराब होतं. त्याचं पॉलीश खराब होतं त्यामुळे अनेकांना दरवर्षी नागरिकांना नवा विकत घ्यावा लागतो आता मात्र त्यांना हा सगळा घाट घालण्याची गरज नसणार आहे कारण मखर विक्रेते अनिल कांबळे यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. दरवर्षी अनेकांच्या घरात नव्या पद्धतीने बाप्पासाठी मखर घेतला जातो. त्यात पैसेही दुपटीने जातात. गौरी गणपती असेल तर मोठा मखर घ्यावा लागतो.
गेली अनेक वर्ष झाले त्यांचा मखर तयार करण्याचा व्यवसाय आहे. मात्र मागील 7 वर्ष त्यांनी या रिसायकल मखर तयार करायला सुरुवात केली आहे. दरवर्षी नागरीक नवीन मखर घेतात आणि जुनं मखर फेकून देतात. अनेकदा ते मखर थर्मोकोलचे असतात. त्यामुळे या सगळ्या मखरांचा पर्यावरणावर देखील परिणाम होतो. त्यामुळे आम्ही ही शक्कल लढवली आहे. या मखरांना पुणेकरांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 700 रुपयांपासून ते 17 हजार रुपयापर्यंत मखर आमच्याकडे उपलब्ध आहेत, असं व्यावसायिकांनी सांगितलं आहे.
कच्चा मालाच्या किंमतीत वाढ
कोरोनानंतर सगळ्या गोष्टींच्या किंमतीत वाढ झाली. त्यात सगळ्यात जास्त वाढ कच्चा मालांच्या किंमतीत झाली आहे. त्यामुळे यंदा गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या देखील किंमतीत वाढ झाली आहे. याचा फटना व्यावसायिकांपासून नागरीकांपर्यंत सर्वांना बसतो आहे. यावर्षी दोन वर्षांनी बाजारपेठ गजबजली आहे. नवनवीन प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे. नागरीक देखील दोन वर्षांनी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी नागरीक देखील उत्साहात असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं आहे.