पिंपरी-चिंचवड: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे, सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडण्यास सुरूवात केली आहे. अशातच राज्यातील काही महानगरपालिकांमध्ये बिनविरोध निवड झाली, त्यामध्ये सर्वांत जास्त भाजपच्या जागा आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या सर्वाधिक उमेदवारांनी बिनविरोध बाजी मारल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit Pawar) यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत याबाबत शंका उपस्थित करत भाजपच्या रणनीतीवर सडकून टीका केली. तसेच भाजप सत्ताकाळात दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळीच तयार झाल्याचेही अजित पवार म्हणाले. यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे भाजपकडूनही अजित पवारांना याबाबत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर देत थेट इशारा दिला आहे.
Ravindra Chavan: सेटिंग करायची नाही. माझं लक्ष आहे
रवींद्र चव्हाण यांनी बोलताना म्हटलं की, कोणाच्या जीवावर कोण काय म्हणतंय. आपण रोज जेवतो ना कसं सरळ हाताने जेवतो की उलट हाताने जेवतो. त्यामुळं निधी थेट मिळवायचा असेल तर भाजपला निवडा, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रलोभन दिलं आहे. शहराध्यक्ष पॅनेल पूर्णच्या पूर्ण आला पाहिजे, सेटिंग करायची नाही. माझं लक्ष आहे. मी लेखाजोखा करायला बसलोय. त्यामुळं पॅनेल निवडून आलाच पाहिजे. चव्हाण यांनी असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि अजित पवारांचे उमेदवार नाना काटे यांच्यात सेटिंग झालं आहे. हे दोघे एकाच प्रभागात लढत आहेत आणि दोन भाजपचे आणि दोन राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडायचे सेटिंग आहे.
Ravindra Chavan: पवारांना युतीत घेतल्याचा पश्चाताप होतोय का?
दरम्यान अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप होतो का? पत्रकारांच्या प्रश्नाला रवींद्र चव्हाणांनी हो असं उत्तर दिलं आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं होतं, की अजित पवारांना सोबत घेताना विचार करा? आपण भाषणात असं म्हटलं म्हणजे अजित पवारांना युतीत घेतल्याचा पश्चाताप होतोय का? या प्रश्नावर बोलताना रवींद्र चव्हाण, हो, कार्यकर्ते मला रोज सांगतात. प्रदेशाचा मी अध्यक्ष आहे, त्यामुळं कार्यकर्ते मला हे सांगण्याचा प्रयत्न करतात, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पैलवानाच्या नादी लागायचं नसतं, महेश लांडगे पैलवानकी अजून सुरुये ना? असम म्हणत चव्हाण यांनी अजित पवारांना थेट इशारा दिला आहे. काल पत्रकार परिषदेत बरेच काही आरोप करण्यात आले, पण मी एकचं सांगतो की पैलवनाच्या नादी लागायचं नसतं, महेश लांडगे पैलवानकी सोडली नाही नं? हा तेच विचारायला मी आलोय. त्यामुळं पैलवनाच्या नादी लागू नका असा इशारा त्यांनी दिला आहे.
