पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात लाखो विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्न घेऊन पाऊल ठेवतात. येथील अनेक संस्था या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतात, त्यांच्या आयुष्याला दिशा देतात, कलाटणी देतात. या शिक्षणसंस्थांपैकीच एक सर्वात मोठी आणि नामवंत शिक्षणसंस्था म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. मात्र, सध्या पुण्यातील हे नामवंत विद्यापीठ वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. येथील वसतिगृह क्र.6 मध्ये 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे आढळून आली असूनया विद्यार्थ्यांच्या साहित्याची चक्क उंदरांकडून नासधूस झालेली आहे. त्यामुळे, विद्यापीठाच्या वसतीगृहातील उंदरांचा (Rat) सुळसुळाट सध्या पुणे विद्यापीठ आणि पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून गेल्या तीन महिन्यांपूर्वी मुख्य वसतिगृह प्रमुखांना याबाबत तक्रार सुध्दा दिलेली होती. तरीसुद्धा या विषयात विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतलेली नाही. या सर्व गोष्टीवरून वसतिगृह प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हिंदी विभागाचे आणि अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी मुख्य वसतिगृह प्रमुखांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी एकदाही या विषयाची दखल घेतली गेली नाही, असादेखील आरोप आता विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.
वसतिगृहातील उंदरांनी एका विद्यार्थ्याच्या पायाला सलग चार वेळा चावा घेतला आहे. त्यामूळे, त्या विद्यार्थ्याला 2 दिवस हॉस्पिटल दाखल केले होते. त्यामधे रेबीज या रोगाची लक्षणी आढळून आली आहेत. याशिवाय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खाण्याचे पदार्थ, कपडे आणि पुस्तकांचीही नासधूस उंदीर मामांनी केल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. त्यामुळे, या विद्यार्थ्यांना त्वरीत नवीन रूम उपलब्ध करुन द्यावी, सर्व वसतिगृहात पेस्ट कंट्रोल करुन घ्यावे आणि स्वच्छते विषयी काळजी घ्यावी अशी मागणी एबीव्हीपीने केली आहे. तसेच, लवकरच लवकर दखल न घेतल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
पिझ्झा मागवल्याने विद्यार्थींनींना प्रवेशबंदी
दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील मागासवर्गीय वसतिगृहात पिझ्झा मागवला म्हणून विद्यार्थिनींना एक महिन्यासाठी वसतिगृहात प्रवेश मज्जाव करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, संबंधित विद्यार्थींना केवळ तशी नोटीस दिली होती, प्रत्यक्षात तशी कारवाई केली नाही, असं म्हणत वसतिगृहाच्या प्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी यूटर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. तसेच विद्यार्थिनींनी देखील आता माघार घेतल्याचं दिसून येतंय. त्यामुळे, या वसतिगृहानंतर आता पुणे विद्यापीठाचं वसतिगृह उंदरांमुळे चर्चेत आलं आहे.
हेही वाचा
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी