Ramdas Athavale In Pune: विरोधक रोज आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काहीही झालं तरी आमचं सरकार पडणार नाही. शिवसेनेनं आपली बाजू बदलली. सुरुवातील शिवसेना भाजप आणि आरपीआयबरोबर होती. मात्र त्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता स्वीकारला आणि आमच्यापासून दूर गेली. मात्र आता शिंदे गट आणि भाजप एकत्र आलं आहे. त्यामुळे विरोधक आमचं सरकार पाडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ते प्रयत्न देखील करत आहेत. मात्र सरकार पडणार नाही आहे. उलट आम्ही एकत्र येणार आहोत. सत्तेत वाटा मिळण्यसाठी प्रयत्न करत आहोत. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असं  रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. बालगंधर्व रंगमंदिरात रिपाइंचा मेळाव्याच्या वेळी ते बोलत होते.


यावेळी त्यांनी विरोधक करत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या आंदोलनावर भाष्य केलं. नेहमीप्रमाणे कविता सादर करत त्यांनी विरोधकांना खडसावलं. ते म्हणतायत 50 खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के, अशा कवितेच्या चारओळी आठवले यांनी ऐकवल्या.


 


यंदाच्या डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या निवडणूका होतील, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. प्रभाग रचनेमुळे आणि अन्य काही कारणामुळे निवडणूका रखडल्या आहेत. मात्र पुण्यातील नाही तर राज्यातील प्रत्येक शहरात या निवडणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. पुण्यात देखील सर्व पक्षाने निवडणूकीसाठीची तयारी सुरु केली आहे. विविध आंदोलनं, विकास कामं करण्यासाठी सरसावले आहेत. मात्र ठाकरे सरकारने प्रभागरचनेचा निर्णय बदलल्यामुळे निवडणुकीचा गोंधळ झाला. आता निवडणुक आयोगानेही सध्या निवडणूका घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. विरोधकांनी उगाच विरोध करु नये, असंदेखील ते म्हणाले.


ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आठवलेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या आरक्षणाबद्दल चर्चा झाली. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवं. अमृत योजनेसाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशा मागण्या ब्राह्मण महासंघाने केल्या. मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं तर ब्राह्मण समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी पुर्वीच केली असल्याचं त्यांनी सांगितलं.