पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये थरारक घटना समोर येत आहेत. वैवाहिक जीवनात आपल्या पार्टनरसोबत होत असलेल्या वादातून मोठ्या हत्याकांडाच्या घटना समोर येत आहेत. मेरठच्या सौरभ राजपूतची निर्घृण हत्या, उत्तर प्रदेशमध्ये पैशासाठी नव्या नवरीने आपल्या नवऱ्याला सुपारी देऊन संपवलं. त्यानंतर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आता बंगळुरमध्येही आणखी एका हत्याकांडाची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली, तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि तो एका सुटकेसमध्ये भरला. पत्नीच्या हत्येनंतर सासरच्या लोकांनाही त्याने फोनवरुन सगळी माहिती दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपी पतीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. 

 मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये...

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर यांचे 2 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. एक- दोन महिन्यापूर्वीच दोघेही बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी बंगळूर पोलिसांना देखील यामध्ये मध्यस्थी करत दोघांची समजूत घातली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले. हा वाद टोकाला पोहोचला. संतापलेल्या राकेश खेडकरने पत्नी गौरीवर चाकूने वार करत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. याची माहिती त्यांनी जोगेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती. त्यानंतर तो स्वतःच्या खाजगी वाहनाने बंगळुरू वरून जोगेश्वरीला येत होता. जोगेश्वरीला जात असतानाच त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध व फीनेल पिले, त्यामुळे तो शिरवळच्या जवळपास बेशुद्ध झाला.

ससून रुग्णालयात दाखल 

स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता हा आरोपी असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी सकाळी राकेश खेडेकरला भारती हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते, त्यानंतर उपचार करून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून उपचार झाल्यानंतर त्याला बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

नेमकं काय घडलं?

कर्नाटक राज्यातील बंगळुरूच्या हुलीमावू भागात ही भयंकर घटना घडली आहे. महाराष्ट्रातील राकेश खेडकर नावाच्या व्यक्तीने पत्नी गौरी सांबेकर (32) हिचा खून केला. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरले. यानंतर त्याने पत्नीच्या आई वडिलांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता घरात त्यांना एक सुटकेस सापडली. पोलिसांना सुटकेसमध्ये गौरीचा मृतदेह आढळून आला. 

दोन वर्षांपूर्वी लग्न झालेलं लग्न...

राकेश आणि गौरी या दोघांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं असून अवघ्या महिन्याभरापूर्वी दोड्डा कम्मनहल्ली येथे ते राहण्यासाठी गेले होते. दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला असून सध्या वर्क फ्रॉम करत होते. गौरी आणि राकेश दोघेही घरून काम करायचे. त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. हे भांडण इतकं वाढलं आणि विकोपाला जायचं की, त्यांच्या शेजाऱ्यांनाही त्याचा त्रास होत होता. दोघांमधल्या भांडणाचा राकेशच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता. हत्येआधीही दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. वाद इतका वाढला की त्याने रागाच्या भरात गौरीच्या पोटात वार केले. त्यानंतर गळा चिरून तिची हत्या केली. हत्येनंतर राकेशने गौरीचा मृतदेहाचे तुकडे केले आणि एका मोठ्या ट्रॅव्हल सुटकेसमध्ये भरला आणि बाथरूममध्ये टाकून पळ काढला.

त्यानंतर राकेशने स्वत: गौरीच्या आई वडिलांना हत्या केल्याची माहिती सांगितली. यानंतर त्याने महाराष्ट्र पोलिसांना याची माहिती दिली. महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून घटनेबाबत कळवलं. महाराष्ट्र पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.