पुणे : शहरातील हगवणे पिता-पुत्रांचे कारनामे संपायचं नावच घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून या बाप-लेकांच्या फसवाफसवी आणि गुंडगिरीचे अनेक प्रकरणं समोर आली आहेत. आपल्याच सुनेचा पैशासाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे (Vaishnavi hagwane) कुटुंबीयांवर गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये, पती शशांक आणि सासरा राजेंद्र सध्या तुरुंगात असून आता आणखी एका व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसंदर्भात माहिती दिली आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावच्या प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे व शशांक राजेंद्र हगवणे यांच्याकडून जेसीबी (JCB) खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची पोलीस (police) तक्रार नोंदवली आहे. 

प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यासमवेत 24 लाख रुपयांचा जेसीबी विकत घेण्याचा व्यवहार माहे मार्च 2022 मध्ये केला होता. व्यवहार ठरला तेव्हा प्रशांत येळवंडे यांनी त्यांना पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता. सदर जेसीबीवर रुपये 19 लाखाचे इंडसइंड बँकेचे कर्ज असल्याने कर्जाचे हप्त भरण्यासाठी प्रशांत येळवंडे यांनी ठरल्याप्रमाणे हगवणे यांना दरमहा रुपये 50 हजार देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे हप्ते भरण्यासाठी एकूण रुपये 6 लाख 70 हजार लता हगवणे यांच्या अकाउंटवर जमा करण्यात आले होते. मात्र, हगवणे यांनी बँकेचे हप्ते भरले नाही व सदर रक्कम स्वतःसाठी वापरली. त्यामुळे सदर जेसीबी कर्ज देणारी इंडसइंड बँकेने प्रशांत येळवंडे यांच्याकडून ऑगस्ट 2024 मध्ये ताब्यात घेतला. त्यानंतर हगवणे यांनी सदर जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला, पण प्रशांत येळवंडे यांच्या पुन्हा ताब्यात दिला नाही. त्यामुळे प्रशांत येळवंडे हे त्यांची एकूण रक्कम 11 लाख 70 हजार रुपये परत मिळावी किंवा जेसीबी त्यांना ताब्यात द्यावा यासाठी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा करत होते. 

हगवणे यांनी त्यांना दाद दिली नाही. तसेच प्रशांत येळवंडे यासंबंधी एकदा चर्चा करण्यासाठी गेले असता शशांक हगवणे यांनी त्यांच्या कमरेला लावलेल्या पिस्तूलवर हात ठेवून त्यांना "तू मशीन 14 महिने वापरली आहे, आता पैसे मागू नको नाही तर घरचे नीट राहणार नाहीत" अशी धमकी दिली होती. सतत पाठपुरावा करून देखील रक्कम किंवा जेसीबी न मिळाल्याने प्रशांत येळवंडे यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज दिलेला असून सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही चालू आहे.

काय कारवाई होणार हे पाहावे लागेल

दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे हगवणे कुटुंबीयांची व त्यांच्या बाप-लेकांची दादागिरी व हावटरटपणा समाजापुढे आला असून त्यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता, जेसीबी खरेदी प्रकरणात काय कारवाई होणार हे पाहावे लागेल. 

हेही वाचा

देशासोबत विश्वासघात, ATS ने ठाण्यातून आरोपीला उचललं, पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप