हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा
हगवणे कुटूंबीयांचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला असून हगवणे कुटूंबीयांनी चित्रपट क्षेत्रातही पैसा लावल्याची माहिती आहे.

पुणे : वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagwane) आत्महत्या प्रकरणानंतर पुण्यातील (Pune) हगवणे कुटुंबीयांचे अनेक कारनामे समोर आले आहेत. सुनेचा छळ करणे, धमक्या देणे, पैशांची फसवणूक करणे, बैलाच्या वाढदिवशी गौतमीला नाचवणे यांसह अनेक कारनामे समोर आले असून सध्या हगवणे कुटुंब सुनेच्या आत्महत्या प्रकरणी कोठडीत आहे. मात्र, कोठडीत असतानाही राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या लेकांच्या गोष्टी समोर येत असून आता पुतण्या संतोष हगवणेंसाठीही त्यांनी एका चित्रपट (cinema) दिग्दर्शकाला धमकावल्याची माहिती समोर आली आहे. कालच, हगवणे यांच्याकडून एका जेसीबी व्यवहारात जेसीबी खरेदी करणाऱ्यास 11 लाख रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार पोलीसात दाखल झाली होती. त्यानंतर, आता चित्रपट दिग्दर्शकाने हगवणेंनी आपल्याला फसवल्याची माहिती दिली आहे.
हगवणे कुटूंबीयांचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला असून हगवणे कुटूंबीयांनी चित्रपट क्षेत्रातही पैसा लावल्याची माहिती आहे. राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे यांने 'खुर्ची' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'खुर्ची' चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांचे हगवणे यांनी लाखो रुपये थकवल्याचा आरोप संबंधित दिग्दर्शकाने केला असून या चित्रपटाचे पोस्टरही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शशांक आणि वैष्णवीच्या लग्नात फॉर्च्युनर कारची चावी देखील अजित पवारांच्याच हस्ते हगवणे कुटुंबीयांनी स्वीकारली होती. आता, हगवणेंशी संबंधित आणखी एका गोष्टीचे प्रमोशन अजित पवारांच्या हस्ते झाल्याचे दिसून येत आहे.
चित्रपट दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांना हगवणे यांच्याकडून सातत्याने धमक्या येत होत्या. त्यासंदर्भात अविनाश पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार देखील केली आहे. याशिवाय पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडेही लेखी तक्रार केली होती. मात्र, कुठलाही कारवाई झाली नाही. तर, राजेंद्र हगवणे यांची गाडी Ford Endeavour ही कार 'खुर्ची' चित्रपटात वापरण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे यांनी चित्रपट दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांना पिस्तूल सुद्धा दाखवली होती. माझे मामा पोलीसमध्ये मोठ्या पदावर आहेत, एटीएसमध्ये आहेत तू माझं काहीच करू शकत नाही, असा दमही दिला होता. त्यामुळे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा दबाव टाकून हगवणेंनी आणखी एकास दम दिल्याचे उघडकीस पडलं आहे.
जालिंदर सुपेकर यांची बदली
वैष्णवीचे मामेसासरे आणि शशांक हगवणेचे मामाम जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आल्याच गृह वाभागाने काढलेल्या आदेशात म्हटलंय. जालींदर सुपेकर हे वादग्रस्त हगवणे बंधुंचे मामा आहेत. त्यांच्याच, सहीने सुशील आणि शशांकला शस्त्र परवाना 2022 मधे शस्त्रपरवाना मिळाल्याचे एबीपी माझाने समोर आणले होते. याप्रकरणी, हगवणे बंधुंनी परवान्यासाठी खोटे पत्ते दिल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलाय.
हेही वाचा
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर





















