Raigad Diveagar beach Tragedy: रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. पुण्यातील आळंदी (Alandi news) येथील विनर्स अकॅडमीमधील अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि शिक्षक असे मिळून 48 जण दिवेआगर (Diveagar) याठिकाणी सहलीसाठी आले होते. मात्र, ही सहल या सर्वांसाठी आयुष्यातील एक कटू आठवण ठरली. दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने या विद्यार्थ्यांपैकी आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. (Diveagar beach news)

Continues below advertisement

या सर्वांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. हे मृतदेह श्रीवर्धन जिल्हा उपरुग्णालयात ठेवण्यात आले होते. पहाटे 4 वाजेपर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया पार पडल्यानंतर आठही मुलांचे  मृतदेह  शुक्रवारी पहाटे आळंदीच्या दिशेने रवाना करण्यात आले होते. हे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताना या मुलांच्या पालकांना अश्रू अनावर झाले. तत्पूर्वी काल रात्रीच सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची बसही दिवेआगर येथून आळंदीच्या दिशेने निघाली. आनंदाचे चार क्षण व्यतीत करण्यासाठी याठिकाणी आलेले विद्यार्थी आणि शिक्षक काळ्या आठवणी घेऊन दिवेआगरमधून निघाले. ही बस शुक्रवारी पहाटे आळंदीत दाखल झाली. याठिकाणी अत्यंत शोकाकूल वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे पालक आणि नातेवाईक एकमेकांच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहेत. 

ही दुर्घटना घडल्यानंतर काल रात्री महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे श्रीवर्धनमध्ये गेल्या होत्या. त्यांनी मृत मुलांच्या पालकांची आणि नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेबद्दल अदिती तटकरे यांनी शोक व्यक्त केला. दिवेआगर हा सुरक्षित समुद्रकिनारा आहे. याठिकाणी अशी दुर्घटना घडणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. निसर्ग आणि त्याच्या मर्यादांचे पालन करणे गरजेचे  आहे. मृतांच्या कुटुंबासोबत संपूर्ण सरकार पाठीशी असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले.

Continues below advertisement

Aditi Tatkare: अदिती तटकरे पोलिसांवर संतापल्या

काल रात्री आळंदीच्या विद्यार्थ्यांची बस आळंदीच्या दिशेने रवाना झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या बससोबत पोलिस कर्मचारी न पाठवल्याच्या मुद्द्यावरून मंत्री आदिती तटकरे पोलिस अधिकाऱ्यांवर संतापल्या. दिवेआगार दुर्घटनेतील विद्यार्थ्यांची बस रात्री दिवेआगार येथून ताम्हिणी घाट मार्गे आळंदीला मध्यरात्री निघाली. विद्यार्थ्यांची मनःस्थिती घाबरलेली होती, याचा उल्लेख करीत आदिती तटकरे यांनी पोलिसांना प्रश्न विचारले. ताम्हिणी घाट मार्गे रात्रीचे वेळी बस जाणार असताना सोबत पोलिस कर्मचारी का दिला नाही, असा सवाल आदिती तटकरे यांनी केला. पोलिसांच्या या बेजबाबदारपणावर आदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. 

Diveagar news: दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीच्या विद्यार्थ्यांची सहल दिवेआगर येथे सहलीसाठी आली होती. यामध्ये 25 मुलं, 17 मुली असे 42 विद्यार्थी आणि 6 शिक्षक यांचा समावेश होता. भरतीच्या पाण्यात पोहताना या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे काहीजण बुडायला लागले. आपल्या मित्रांना वाचवायला काही विद्यार्थी आत गेले. मात्र, त्या नादात सगळ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मयत मुलांची नावे खालीलप्रमाणे  1) तन्मय दत्तात्रय वहीले 2) सुमित भरत अहिरे3) प्रणव रामदास बनसोडे  4) कैवल्य सतीश वासनकर 5) राजवीर युवराज वहीले 6) यश किरण वानखेडे 7) सोहम तुकाराम भांडवलकर 8) कौस्तुभ संदीप दौंड 

या सर्वांचे वय (16 वर्षे) असून ते पुणे जिल्ह्यातील आळंदीचे रहिवाशी आहेत. 

आणखी वाचा

मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती