Pune ZP Election : अजितदादांच्या निधनानंतरही घड्याळाची टिकटिक जोरात; पुणे जिल्हा परिषदेत किती जागा मिळणार? 'प्राब'चा धक्कादायक Exit Poll समोर
Pune ZP Election Exit Poll : पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित लढवण्यात येत आहे. या दरम्यान, अजित पवारांचं अपघाती निधन झालं.

पुणे : अजित पवारांच्या निधनानंतर होत असलेल्या पहिल्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून सोमवारी, 9 जून रोजी त्याचा निकाल हाती येणार आहे. मात्र, त्या आधी पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस ब्युरो (PRAB Exit Poll) म्हणजेच प्राब या संस्थेचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी स्पष्ट बहुमत मिळवत सत्तेत येणार असल्याचं म्हटलं आहे.
जिल्हा परिषद मतदानानंतर पुण्यासाठीचा प्राबचा एक्झिट पोल समोर आला. या पोलनुसार पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं म्हटलंय. एकूण 73 पैकी 47 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 18 जागांसह भाजप दुसऱ्या स्थानी राहू शकतं.
याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंच्या शिवसेनेला एका ठिकाणी विजय मिळू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातून काँग्रेस हद्दपार होत असल्याचा अंदाज प्राबने वर्तवला आहे.
PRAB Exit Poll ZP Election : प्राबचा एक्झिट पोल काय म्हणतोय?
- राष्ट्रवादी काँग्रेस - 47
- भाजप- 18
- शिवसेना शिंदे गट - 6
- शिवसेना ठाकरे गट - 1
- काँग्रेस - 0
- अपक्ष - 1
- एकूण - 73
Pune ZP Election : काँग्रेस पुण्यातून हद्दपार होणार?
पुणे जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा या राष्ट्रवादीला मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचसोबत काँग्रेसला मात्र पुण्यात एकही जागा जिंकता येणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे जर खरं ठरलं तर पुण्यातून काँग्रेस हद्दपार होण्याची शक्यता आहे.
Pune NCP Alliance : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
पुणे महापालिकेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याचं दिसून आलं. अजित पवार हयात असतानाच दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊन एकत्रित लढण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे घड्याळ या एकाच चिन्हावर लढणार असं ठरलं होतं. या सर्व उमेदवारांची जबाबदारीही अजित पवारांनी घेतल्याची माहिती होती.
तर राज्यात ज्या ठिकाणी जे चिन्हे सोईचं ठरेल त्या ठिकाणी त्या चिन्हावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचं दोन्ही राष्ट्रवादींचं निश्चित झालं होतं. त्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादींनी एकदिलानं प्रचारही सुरू केला होता.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी बारामतीला येत असलेल्या अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दाही मागे पडल्याची चर्चा आहे.
ही बातमी वाचा:
























