पुण्यात ऑफिसवरुन घरी जाणाऱ्या महिलेला दारु पाजून बलात्कार
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2016 02:48 PM (IST)
पुणे : पुण्यातील धनकवडी भागात 25 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास कामावरुन घरी जाणाऱ्या महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पीडित महिला कामावरुन रात्री घरी पायी चालत जात होती. त्यावेळी धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीजवळ, ज्ञानेश्वर सोसायटी परिसरात दोन अनोळखी इसमानी तिच्या डोक्यात मारुन जखमी केलं. त्यानंतर महिलेला बाजूच्या मोकळ्या जागेत ओढत नेऊन जबरदस्तीने दारु पाजली. त्यापैकी एकाने तिच्यावर अत्याचार केला आणि ते पळून गेले. पीडित महिलेला कपाळावर, हातावर, पायावर जखमा झाल्या आहेत. तिला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 20 वर्षीय नवनाथ राम जाधव आणि 32 वर्षीय खंडू बापू लोंढे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.