मंचर, पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढल्याचं दिसत आहे. त्यातच शिकारीचा (Leopard Attack ) पाठलाग करण्यासाठी पळत असताना बिबट्याचा बछडा विहिरीत पडल्याची घटना समोर आली. आंबेगाव तालुक्यातील नागापूर या परिसरात ही घटना घडली आहे. एक तासांच्या परिश्रमानंतर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यानंतर काही वेळ या बिबट्याला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं होतं त्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आलं आहे. 


सध्या पुण्य़ाच्या आसपासच्या परिसरात बिबट्यांची दहशत दिसून येत आहे. त्यात अनेक प्राण्यांची शिकार केल्याच्या घटना समोर येतात. पाळीव प्राण्यांना ठार मारणे, दिवसा असो किंवा रात्र नागरिकांवर हल्ला करणे आणि शेतीच्या पिकाचं नुकसान केल्याच्या घटना घडताना दिसत आहे. त्यातच आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास नागापूर येथील कुमार दिनकर गायकवाड यांच्या शेतात काम करणारे हरिदास जयराम यलभर हे वीजपंप सुरु करण्यासाठी विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीतून आवाज आला त्यावेळी बछडा असल्याचं दिसलं. त्यावेळी शेतकऱ्याने वन विभाग आणि सरपंचाला माहिती दिली. वनविभागाने पिंजरा विहीरीत सोडून बछड्याला सुखरूपपणे वर काढले.पकडलेला बिबट बछडा हा अंदाजे एक वर्ष वयाचा आहे. 


चाकणमध्येही केला होता बिबट्याने शिरकाव


मागील महिन्यात पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटे बिबट्या आढळला होता. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचं कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं होतं. जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आलं होतं. 


नागरिक धास्तावले...


मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या बिबट्याचा धडकी भरवणारा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. यात बिबट्या थेट  तीन कुत्र्यांवर हल्ला केलेला दिसत आहे.  त्यातील एकता कुत्र्याची शिकार केल्याचंदेखील सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Maratha Reservation : मराठा नेत्यांना कार्यक्रम, सभा घेऊन देणार नाही; पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाज आक्रमक