Vidyanand Bapat Marathi News: पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) हे डीजेच्या आवाजाला विरोध करणारी भूमिका मांडच आहेत, अशातच आजही एका वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतानाच मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. (Vidyanand Bapat Marathi News) या घटनेनंतर आता विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
रोहित पवारांनी पोस्ट करत म्हटलं की, "गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे भूमिका मांडा, परंतु अशाप्रकारे गुंडगिरी केली जाणार असेल तर हे अजिबात योग्य नाही. पोलीस प्रशासनाने बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर योग्य त्या कायदेशीर कलमाअंतर्गत कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना संरक्षण पुरवावे, ही विनंती!", असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
शिवसेना नेते, रवींद्र धंगेकरांनी याबाबत बोलताना म्हटलं की, बापटांना मारहाण करणे योग्य नाही. त्याला हल्ला म्हणता येणार नाही. त्यांना लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे. पण सगळेच कार्यकर्ते पिंजऱ्यात उभे करुन, हे कायतरी वेगळं करतात, ही त्यांची भूमिका चुकीची आहे. मी बापट यांचा तक्रार अर्ज वाचला आहे. त्यामध्ये त्यांनी रस्त्यावर मंडप टाकू नका, मिरवणुका काढू नका, स्पीकर लावू नका, एकदा त्यांची भूमिका तपासली पाहिजे. त्यांना एकदा काय बोलायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आपण फक्त ते स्पीकरला बोलतात, हे दाखवताय. पण त्यांची सगळी भूमिका तपासली पाहिजे. स्पीकरच्या आडून त्यांना इतर काही उद्योग करायचेत का, हे तपासले पाहिजे. त्यांची भूमिका लोकशाहीच्यादृष्टीने रास्त आहे. त्यांना मारहाण करणे योग्य नाही. गणपती मंडळात माणसं वाचणारे कार्यकर्ते आहेत, तो एकवेळ पुस्तक वाचणार नाही. समाजात सुख:दुखात पहिलं पाऊल त्याचं असतं, त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना दोषी ठरवणे योग्य नाही.
Ganesh Beedkar: भाजपचे गटनेते गणेश बीडकर काय म्हणाले?
भाजपचे गटनेते गणेश बीडकर म्हणाले, हे अत्यंत चूक आहे, लोकशाहीला धरून नाही, भाजप या घटनेचा निषेध करते. मी आणि माझा पक्ष वैयक्तिकरित्या बापट साहेबांसोबत आहोत. त्यांनी सामान्य पुणेकरांची भूमिका मांडली. वादविवाद, मतमतांतरे असू शकतात, पण अशा पद्धतीने वागणे चुकीचे आहे. हे पुण्याच्या संस्कृतीला आणि भाजपच्या विचारसरणीला शोभणारे नाही. त्यामुळे आम्ही या प्रकाराचा निषेध करतो.
Vidyanand Bapat Beating : पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गुरुवारी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते. विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
Vidyanand Bapat Beating : हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट काय म्हणाले?
तुम्ही मला विचारत होतात तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. मी म्हणतोय ना, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...चिप प्रसिद्धीसाठी हल्ला केला. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही,याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला.
Who is Vidyanand Bapat : कोण आहेत पुण्यातील विद्यानंद बापट?
विद्यानंद बापट यांच्यामागे कोणताही राजकीय, सामाजिक असा मोठा परिचय नाही. विद्यानंद सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. विद्यानंद बापट हे 37 वर्षीय असून ते बीपीओ क्षेत्रात काम करतात. त्यांचं बहुतांश काम हे घरातूनच सुरू असतं. मुळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात.
