SPPU Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU)  विविध विभागांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.आजपासून (21 जुलै) प्रवेश परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एकूण 21 हजार 670 अर्ज प्राप्त झाले आहेत. दरवर्षी पुणे आणि महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध विभागात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करतात. मात्र कोरोनानंतर यावर्षी अर्जाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.


पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी ही ऑनलाइन परीक्षा 21 जुलै ते 24 जुलै दरम्यान महाराष्ट्रासह भारतभरातील 22 केंद्रांवर होणार आहे. ही परीक्षा 100 गुणांची आहे. ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत, त्या अभ्यासक्रमांसाठी कोणतीही प्रवेश परीक्षा होणार नाही, अशी माहिती विद्यार्थ्यांना आयएलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.


SPPU मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि या अंतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा एकूण 174 अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 174 विविध अभ्यासक्रमांसाठी एकूण 7 हजार 850 जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रावर परीक्षेला हजर राहायचे आहे. याबाबतची सर्व माहिती विद्यार्थ्यांना आधीच देण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रवेश विभागाने दिली आहे. पदवीसाठी 748, पदव्युत्तर पदवीसाठी 18270, डिप्लोमासाठी 725, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासाठी 909, प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी 1018 अर्ज करण्यात आले आहेत. 


SPPU च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून विशेष परीक्षा


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेवा योजनांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेसाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या इतर गुणांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची संधी असणार आहे. विशेष परिक्षा नसल्याने याआधी अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी अडचणी येत होत्या मात्र त्याची ही अडचण समजून घेत विद्यापीठाने निर्णय घेतला आहे.