पुणे : पुणे शहरामध्ये एक महापालिका असून चालणार नाही, शहराचा राजकीय, सामाजिक व भौगोलिक विचार करून शहराचे काही भाग करावे लागतील. आता फार उशीर करून चालणार नाही. पीएमआरडीए म्हणजे महापालिका नाही, हा विचार करून पुण्यासाठी दोन स्वतंत्र महापालिका करण्याशिवाय पर्याय नाही.'  असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल (मंगळवारी) पुण्यात केलं आहे. त्यामुळे आता पुण्यात दोन स्वतंत्र महापालिकेबाबातच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.


नेमकं काय म्हणालेत चंद्रकांत पाटील?


चंद्रकांत पाटील म्हणाले, मागील पाच वर्षे कोरोना आणि राजकीय अस्थिरता होती, हे मान्य करावे लागेल. मागील पाच वर्षे विस्कळीत गेली. नगरसेवक नाहीत, त्यामुळे विविध समस्य निर्माण झाल्या आहेत. आता स्थिर सरकार आले आहे, त्यामुळे कामांना गती देण्यात येईल. येत्या 22 जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय लवकरच होईल. यानंतर महापालिकेच्या प्रभाग रचना व अन्य तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत येत्या पंधरा तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुण्याच्या प्रश्नांना गती देण्यात येईल असेही चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदार व मंत्र्यांसोबत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही भूमिका मांडली. 


याबाबत पुणेकर काय म्हणतात?


गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात काही गावांचा समावेश झाला आहे, त्यामुळे पुण्यात प्रचंड वाहतुकीचा प्रश्न आहे. वाढती लोकसंख्या आहे. खड्ड्यांचे प्रश्न आहेत. पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे. त्यानंतर चांदणी चौकात होणार वाहतूक कोंडी आहे. सर्वत्र समस्या आहेत. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेवरती सर्व भार आहे आणि पालिकेवर इतका भारी टाकून चालणार नाही. त्यामुळे अग्रेसर जर व्हायचं असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहेत, तशीच पुणे महानगरपालिका देखील आहे. तर अतिरिक्त एक महानगरपालिका झाली तर लोकांची सोयी सुविधा आणि प्रश्न मार्गी लागतील अशी भूमिका एका पुणेकरांनी व्यक्त केली आहे. 


पुण्याच्या बाहेर जायचं झालं तरी एक-दीड तास लागतो, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे अतिरिक्त महानगरपालिका झालीच पाहिजे असं मत पुणेकरांनी व्यक्त केला आहे 


शहरात मेट्रोची कामे किंवा वाहतूक कोंडीमुळे काही अडचणी निर्माण होत आहेत आणि पुण्यामध्ये स्थलांतरित लोक आहेत, त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आहे. अनेक समस्या आहेत. त्यामुळे जर दोन महानगरपालिका झाल्या तर पुणेकरांना अधिक सोयीचं होईल असेही एका पुणेकरांनी म्हटलं आहे. 


अतिरिक्त महानगरपालिका आवश्यक आहे. रस्ते वाहतूक वाहतूक कोंडी अशा अनेक समस्या वाढत चाललेले आहेत. जर त्या समस्या सोडायचे असतील तर तिसरी महानगरपालिका होणे आवश्यक आहे असे काहींनी म्हटले आहे. 


पुण्याला तुम्ही स्मार्ट सिटी म्हणतात. मात्र, ही स्मार्ट सिटी आहे का? दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणुका प्रलंबित आहेत. अनेक योजना आणल्या त्यापैकी काही योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या ज्या योजना जाहीर केल्या जातात त्यांच्या अंमलबजावणी होते का? ते प्रश्न आज नागरिकांना आहेत. स्वच्छता, वाहतूक कोंडी, रस्ते असे अनेक प्रश्न आहेत. जर अतिरिक्त महानगरपालिका झाली तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे नियोजन केलं जाईल, असं मत एका युवा पुणेकरानी व्यक्त केलं आहे.


पुण्याच्या दोन महापालिका होण गरजेचं- श्रीकांत गबाले


भौगोलिक अभ्यासक श्रीकांत गबाले यांनी पुण्याच्या दोन महापालिका होण गरजेचं आहे, असं मत व्यक्त केलं आहे. 10 लाख लोकसंख्यांची 1 महापालिका असते, मात्र पुण्याची सध्याची लोकसंख्या 45 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे 4 महापालिका हव्यात पण दोन तरी झाल्या पाहिजे. महापालिका दोन झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणत सुटेल. पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, डंपिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लागेल. वाढलेल्या लोकसंख्या आणि पुण्याचं नीट नियोजन होईल. 2020 ला काही गाव महापालिकेत समाविष्ठ झाल्यावर देखील वेगळ्या महापालिकेची मागणी झाली होती.मात्र, चार वर्षात याबाबत कोणतंही काम झालं नाही. आता हे काम होणं गरजेचं आहे. पुण्यात जायकासारखे प्रोजेक्ट सुरु आहेत, असे अनेक प्रोजेक्ट आल्यावर यंत्रणा नीट काम करण्याची गरज आहे, त्यामुळे पुण्याच्या दोन महापालिका होण गरजेचं असल्याचं मत श्रीकांत गबाले यांनी व्यक्त केलं आहे.