Pune: पुणे शहरात मैत्रिणीसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला धमकावून 20 हजार रुपये उकळणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे कारण देत परिमंडळ एकचे प्रभारी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. (Pune Crime)
नेमकं घडलं काय?
विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास तरुण त्याच्या मैत्रिणीसमवेत कारमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी गणेश देसाई व योगेश सुतार हे रात्रगस्तीवर होते. ते दोघेही तेथे आले. त्यांनी तरुणाला तुमच्याबद्दल तक्रार आली आहे,पोलिस ठाण्यात प्रकरण न्यायचे नसेल तर 20 हजार रुपये दे, अशी मागणी केली. तरुणाजवळ सहाजिक एवढे पैसे नव्हते. तर पोलिस कर्मचाऱ्यांनी तरुणास दुचाकीवर बसवून कमला नेहरू पार्क परिसरातील एटीएममध्ये नेले. तेथे त्याच्याकडून 20 हजार रुपये काढून घेतले.
घाबरलेल्या तरुण तरुणीने डेक्कन पोलीस ठाणे गाठलं
या सगळ्याच घडलेल्या प्रकराने घाबरलेल्या तरुण व त्याच्या मैत्रिणीने डेक्कन पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर संबंधित पोलिसांची चौकशी करण्यात आली. या प्रकाराबाबत दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती देणे आवश्यक होते,तरीही त्यांनी तसे केले नाही.त्यांच्या वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवून दोघांचे निलंबन केल्याचा आदेश पोलिस उपायुक्त पिंगळे यांनी दिले. गणेश देसाई आणि योगेश सुतार अशी निलंबन करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जलसिंचन विहिरीच्या प्रस्तावासाठी लाच घेणं भोवलं
बीडच्या (Beed) माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील किट्टी आडगावच्या सरपंचाला (Sarpanch) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंचन विहिरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी पैसे घेणे महागात पडलेय. सरपंच रुक्मानंद खेत्रे याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने मंजूर झालेली विहीर अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी आणि विहिरीच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. 20 हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे याला एसीबीने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.
हेही वाचा: