Pune Traffic Update: पुणे (Pune) शहर परिसरात आज मोहरमच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. शहरातील मध्यभागातील वाहतूक (Traffic) व्यवस्थेत आज (बुधवारी) दुपारनंतर बदल करण्यात येणार आहेत. मध्यभागातील मुख्य मिरवणुकीला आज दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती श्रीशिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीनाथ चित्रपटगृह परिसरातून सुरूवात करण्यात येणार आहे.
शहराच्या मध्यभागासह लष्कर, खडकी, मुंबई- पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मोहरमनिमित्त ताबूत, पंजे, छबिले यांची मिरवणूक काढण्यात येते. मध्यभागातील मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ बुधवारी (१७ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीनाथ चित्रपटगृह परिसरातून होणार आहे. श्रीदत्त मंदिर चौक, बेलबाग चौक, हुतात्मा चौक (बुधवार चौक), शनिवारवाडा, फुटका बुरूज, गाडगीळ पुतळा चौक, डेंगळे पूल, जुना बाजार, शाहीर अमर शेख चौकमार्गे मिरवणूक जाणार आहे. संगम पूल येथे मिरवणूक विसर्जित करण्यात येणार आहे.
मिरवणूक मार्गावरील वाहतूक (Pune Traffic Update) वळवण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.लष्कर भागातील इमामवाडा येथून सकाळी पावणेदहाच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार आहे. इमामवाडा, नेहरू मेमोरिअल हॉल, पोलिस आयुक्त कार्यालय, साधू वासवानी चौक, कॅनोट रस्तामागे इमामवाडा येथे मिरवणूक विसर्जित होणार आहे.
कोणते मार्ग असणार बंद?
श्रीदत्त मंदिर चौक, बेलबाग चौक, हुतात्मा चौक (बुधवार चौक), शनिवारवाडा, फुटका बुरूज, गाडगीळ पुतळा चौक, डेंगळे पूल, जुना बाजार, शाहीर अमर शेख चौकमार्गे संगम पूलापर्यंत मिरवणूक जाणार आहे.