पुणे: स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात घडलेल्या या घटनेनं पुणे हादरलं आहे. नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. त्यामध्ये ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बसमध्ये नेलं आणि अत्याचार केला. ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे. यावेळी नेमकं काय काय घडलं त्याची माहिती देखील समोर आली आहे.
नेमकं काय-काय घडलं?
पिडीत तरुणीला दत्रात्रय गाडेने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी घाबरुन गेली. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर आरडाओरड करण्याचे त्राणही तीच्यात उरलं नाही. 26 वर्षांची तरुणी मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात आली. तीला फलटणला जायचे होते. त्यावेळी स्वारगेट परिसरात सराईत गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे सावज हेरण्याचा प्रयत्न करत होता. 26 वर्षांची ही मुलगी एकटी आहे हे पाहून गाडेने तीला आगारात मधोमध उभी असलेली एस टी फलटणला जाणार आहे असं सांगितलं. सोलापुरहून स्वारगेटला उभी असलेली ही बस पुन्हा सोलापुरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असं त्याने पिडीतेला सांगितलं. हे सगळं सांगताना तो पिडीतेला ताई - ताई असे म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही तरुणी बसमधे चढली. तीच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडे देखील बसमधे चढला आणि त्याने तीच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने या तरुणीला दिली. त्यामूळे घाबरुन जाऊन ही तरुणी तीच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगु शकली नाही. त्यानंतर ती दुसऱ्या बसने फलटणला जायला निघाली. वाटेत असताना तीने हा प्रकार तीच्या घरच्यांना सांगीतला. त्यानंतर पोलीसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये - चाकणकर
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणानंतर महिलांना अनोळखी व्यक्तींशी बोलू नका, त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका असं आवाहन त्यांनी केला आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे, या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे. सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे. ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बसमध्ये नेलं आणि अत्याचार केला. ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे, तर अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. शासकीय यंत्रणा, चौकशी कक्ष हे मदतीला असतातच तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. मात्र, दुर्दैवाने या मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पुढे हा गंभीर आणि वेदनादायी प्रसंग घडला. पोलिसांनी आठ तपास पथक तयार केली आहेत, आठ तपास पथक या सगळ्याचा कालपासून तपास करत आहेत. आरोपीला लवकरच अटक होईल. मात्र, माझं आवाहन आहे की, तरुण मुलींनी, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. यंत्रणांची मदत घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आपण सतर्क रहावे. आता या प्रकरणात या पीडित मुलीच समुपदेशन व तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.