पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकमेव उमेदवार निवडून आला आहे. पुण्यातील प्रभाग १६ मधून नितीन निवृत्ती गावडे असे निवडून आलेल्या नगरसेवकाचे नाव असून त्यांचा ४०४ मतांनी विजय झाला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या गावडे यांना १४ हजार ८३ मतं पडली. प्रभागातील इतर उमेदवार पैशाने बलाढ्य होते पण नागरिक मला त्यांचा कौल देतील असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला होता. आज बाळासाहेब असते तर दोन शिवसेना झाल्या नसत्या, अशी प्रतिक्रिया पुण्यातील उबाठाचे एकमेव नगरसेवक यांनी दिली आहे. पुणे महापालिकेच्या सभागृहात सगळी आव्हानं पेलू आणि जनतेसाठी विकासकामे हाच ध्यास असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

पुण्यात फक्त एका जागेवर पेटली मशाल

ठाकरेसेना, काँग्रेस आणि मनसे आघाडीने पहिल्यांदाच एकत्रित पुणे पालिका निवडणुकीला सामोरे गेले आहेत. परंतु, २०१७ मध्ये १० जागा जिंकणाऱ्या ठाकरेसेना यंदाच्या निवडणुकीत केवळ एकच जागा जिंकता आली, त्यामुळे त्यांनाही हा मोठा धक्का बसला आहे. एका जागेवर मशाल पेटवल्याचे चित्र आहे. शहरातील प्रभाग क्र. १६ क मध्ये ठाकरेंचे नितीन निवृत्ती गावडे यांनी विजय मिळवून शहरात मशाल पेटती ठेवली आहे.

ठाकरेंच्या माजी आमदार पुत्र प्रसाद बाबर, कल्पना थोरवे, रूपेश मोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रमुख उमेदवारांचा पराभव झाल्याने ठाकरेंच्या जागा कमी झाल्या. शिवाय काँग्रेस आणि मनसेसोबत युतीचा फायदा झाला नसल्याचे दिसून आले. तसेच पुण्यात उद्धवसेनेच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा न झाल्याने त्याचाही फटका ठाकरेसेनेला बसला आहे. 

Continues below advertisement

शिवसेना मनसेला मोठा धक्का

शिवसेनेसह, मनसेची देखील पुणे महापालिकेतील सुरुवात निराशाजनक राहिली आहे. दोन्ही पक्षांना महापालिकेत साधे खातेही उघडता आलेले नाही. भाजपसोबत युती करून शिवसेना एकत्र लढणार होती. मात्र, जागा वाटपावरून भाजपने अखेरपर्यंत दोन्ही पक्षांचं जमलं नाही. युती होईल, इच्छेप्रमाणे जागा मिळतील या भ्रमात अखेरपर्यंत पक्षाचे स्थानिक नेते चर्चा करत राहिले, मात्र शेवटच्या दिवशी स्वबळाचा नारा दिला. शिवसेनेने ११९ जागांवर उमेदवार उभे केले. मात्र व्यवस्थित नियोजन आणि सभा यांच्या अभावामुळे पक्षाच्या पदरी निराशा आल्याचं चित्र दिसून येत आहे.

शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मुलगा प्रणव धंगेकर, माजी उपमहापौर आबा बागूल यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. शहरात नेतृत्वाचा अभाव या निवडणुकीच्या पराभवामुळे ठळकपणे दिसून येत असल्याचं चित्र आहे. उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन सभा घेतल्‍या होत्‍या. पक्षाचे वरिष्‍ठ नेते, मंत्री उदय सामंत यांचेही लक्ष होते. सोबत विजय शिवतारे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे हेदेखील पुण्‍यावर लक्ष देऊन होते. मात्र, त्‍याचा अपेक्षित परिणाम पुणेकरांवर पडला नाही. आता पक्ष पुन्हा उभारी घेण्यासाठी काय करणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे.