Pune Scientist Award: पुण्यातील मराठमोळ्या शास्त्रज्ञ डॉ. हिमांशु कुलकर्णी यांनी अभिमानास्पद यश मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उंचावले आहे. भारतीय उपखंडातून प्रथमच एका संशोधकाला ‘इंटरनॅशनल वॉटर प्राईझ’ या मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमा येथील WaTER सेंटरकडून 2009 पासून हा द्विवार्षिक पुरस्कार दिला जातो. पाणीपुरवठा आणि स्वच्छता या क्षेत्रात विकसनशील देशांतील लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणारे उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविले जाते. या पुरस्कारात मानाची ट्रॉफी आणि तब्बल 25,000 अमेरिकी डॉलर (सुमारे 22 लाख रुपये) इतकं बक्षीस आहे.

Continues below advertisement

डॉ. कुलकर्णी यांच्या नावाचा हा पुरस्कार 2024 मध्ये जाहीर झाला होता. मात्र औपचारिक समारंभात 15 सप्टेंबर रोजी त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे पुण्याच्या या शास्त्रज्ञाने केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव वाढवला आहे.

डॉ. कुलकर्णी हे निती आयोगाच्या 12व्या पंचवार्षिक योजनेच्या कार्यकारी गटाचे सह-अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रीय भूजल नकाशा तयार करण्याच्या कार्यक्रमात मोलाची भूमिका बजावली आहे. ते ACWADAM (Advanced Center for Water Resources Development and Management) या संस्थेचे संस्थापक ट्रस्टी आणि सचिव आहेत. या संस्थेमार्फत ते भूजल व्यवस्थापनासाठी समुदाय आधारित भागीदारी या संकल्पनेला प्रोत्साहन देत आहेत.

Continues below advertisement

या यशाबद्दल बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, “हा पुरस्कार ACWADAMच्या माध्यमातून घडवलेल्या अनेक सहकार्यांचा आणि भागीदारींचा सन्मान आहे. भूजल हे सामूहिक स्रोत म्हणून व्यवस्थापित करणे हेच भारतातील भूजल संकटावर उपाय शोधण्याचा खरा मार्ग आहे.”

सध्या डॉ. कुलकर्णी हे शिव नादर इन्स्टिट्यूट ऑफ एमेन्स डिग्री युनिव्हर्सिटीमध्ये ग्रामीण व्यवस्थापनाचे प्रॅक्टिस प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तसेच आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि अशांक देसाई सेंटरमध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणूनही योगदान देतात.

युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमा कडून दिला जाणारा इंटरनॅशनल वॉटर प्राईझ हा पुरस्कार संशोधन, अध्यापन किंवा सेवा कार्याच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पाणीपुरवठा आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना दिला जातो. विशेष म्हणजे या पुरस्काराचा केंद्रबिंदू विकसनशील देशांतील गरीब आणि उपेक्षित समाज आहे.

डॉ. कुलकर्णी यांचा हा सन्मान महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. ग्रामीण भागातील भूजल व्यवस्थापन, त्यावरील धोरणात्मक अभ्यास आणि सामुदायिक सहभागातून निर्माण होणाऱ्या शाश्वत उपायांची जगभरात दखल घेतली जात आहे. त्यामुळे मराठमोळ्या संशोधकाचा हा आंतरराष्ट्रीय सन्मान भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.