पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (Ajit Pawar) शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि आमदार रोहित पवारांची (Rohit Pawar) गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत जागावाटप, काही जागांवर निर्माण झालेला तिढा कसा सोडवायचा, उमेदवार कोणत्या चिन्हावरती लढवायचे याबाबच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवारांच्या पक्षाने अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी टाकताच, त्यांनी थेट अजित पवारांशी गुप्त बैठक घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

NCP Pune : बैठकीय कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र गेलो तर किती जागा शरद पवारांच्या वाट्याला येणार आणि मविआसोबत लढायचं तर किती जागा सर्व घटक पक्षांना मिळतील. अजित पवारांच्या गटाचे इच्छुक ज्या जागेवर लढण्यास तयार आहेत, त्यातील काही ठिकाणी शरद पवारांच्या इच्छुकांचा दावा आहे, हा तिढा कसा सोडवायचा? अशा परिस्थितीत चारच्या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार लढवायचे असतील तर स्वतंत्र चिन्हावर लढवायचे की फक्त घड्याळ चिन्हावर लढायचं? काही प्रभाग फक्त तुतारीच्या चिन्हाचे करता येतील का? अजित पवार गटाचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावर लढतील का?  दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेच तर मविआचे घटक पक्ष सोबत घ्यायला हवेत, असं शरद पवार राष्ट्रवादीचा आग्रह आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना मविआत फूट पडू नये, या दृष्टीने शरद पवार राष्ट्रवादी पावलं टाकू इच्छिते, मात्र ते अजित पवारांना मान्य होईल का? यावर दोन्ही राष्ट्रवादीचं भवितव्य अवलंबून आहे.

NCP Pune : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक पार पडली; कोल्हे, पवार बैठकीला हजर

पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीची काल रात्री गुप्त बैठक पार पडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्यात चर्चा झाली. एक तास झालेल्या बैठकीत जागा वाटपावर बरीच घासाघीस झाली. अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या इच्छुकांनी ही दावा केला आहे. या ठिकाणी नेमके कोणाचे उमेदवार द्यायचे तसेच महाविकासआघाडीतील घटक पक्षांना सोबत घ्यायचं का? यावर बरीच खलबते रंगली. या बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी नो कमेंट्स म्हणत थेट पुणे गाठलं. आता पुण्यात हे दोघे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने संवाद साधणार आहेत. अशी अजित पवार गटाकडून बैठकीत उपस्थित असलेल्या अजित गव्हाणेंनी दिली.

Continues below advertisement