"राष्ट्रीय माध्यमे दिल्लीकेंद्रित झाल्याने प्रादेशिक माध्यमे दुर्लक्षित"; माध्यमकर्मी धन्या राजेंद्रन यांचे प्रतिपादन
माध्यमांमधील समकालीन दुभंगलेपणाच्या पाच अवस्था सांगितल्या. "प्रदेशनिष्ठता, विचारधारा, मालकी, डिजिटल माध्यमे आणि जातीयता, असे पाच दुभंग राष्ट्रीय माध्यमांमध्ये दिसून येत असल्याचं धन्या राजेंद्रन यांनी म्हटलं.

पुणे : "मुद्रित, इलेक्ट्राॅनिक तसेच डिजिटल राष्ट्रीय माध्यमे दिल्लीकेंद्रित आहेत. त्यामुळे प्रादेशिक स्तरावरील पण राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे राष्ट्रीय माध्यमांकडून दुर्लक्षित होतात, या वास्तवाकडे ज्येष्ठ माध्यमकर्मी धन्या राजेंद्रन यांनी शुक्रवारी येथे लक्ष वेधले. 'परिणामी राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक मुद्दे पोहोचू शकत नाहीत', अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 'फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश' व 'पुणे (Pune) श्रमिक पत्रकार संघ' यांच्या वतीने आयोजित व्यंकटेश चपळगांवकर स्मृती व्याख्यान प्रसंगी त्या बोलत होत्या. ‘भारतीय माध्यमांतला समकालीन दुभंग' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. धन्या राजेंद्रन या ‘द न्यूज मिनिट’ या दक्षिण भारताशी संबंधित सुप्रसिद्ध न्यूज वेबसाईटच्या सहसंस्थापिका, संपादिका व प्रसिध्द पत्रकार आहेत. यावेळी पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन व्यासपीठावर उपस्थित होते.
धन्या राजेंद्रन यांनी माध्यमांमधील समकालीन दुभंगलेपणाच्या पाच अवस्था सांगितल्या. "प्रदेशनिष्ठता, विचारधारा, मालकी, डिजिटल माध्यमे आणि जातीयता, असे पाच दुभंग राष्ट्रीय माध्यमांमध्ये दिसून येतात", असे सांगून त्या म्हणाल्या, "माध्यमांमध्ये प्रादेशिक दुभंगलेपण असल्याने राष्ट्रीय महत्त्वाच्या धोरणात्मक निश्चितीसारख्या प्रसंगीही माध्यमे एकत्रितपणे शासनासमोर येत नाहीत. माध्यमांमध्ये एकसंधता नसल्याने हे दुभंगलेपण वाढत जाते. विचारधारेतील भिन्नतेमुळेही माध्यमे एकमेकांपासून अंतर राखतात. माध्यमांची मालकी हा अतिशय गुंतागुंतीचा मुद्दा असतो. माध्यमांची मालकी राजकीय नेत्यांकडे किंवा मोठ्या उद्योगपतींकडे असल्याने, त्यांचे वैयक्तिक प्रभाव माध्यमांच्या कव्हरेजवर परिणाम करतात आणि निखळ पत्रकारिता बाजूला पडते. डिजिटल माध्यमांचे नवेपण अद्याप पुरेसे रुजलेले नाही. त्यामुळे डिजिटल माध्यमांकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जाते का, हा कळीचा मुद्दा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माध्यमांमधील जातीयतेचा मुद्दा दुभंगलेपण सदैव कायम ठेवण्यास हातभार लावत राहतो".
माध्यमांचे दुभंगलेपण स्पष्ट करताना धन्या यांनी स्वतःच्या पत्रकारितेची समर्पक उदाहरणे देत विषय स्पष्ट केला. 'मी प्रादेशिक माध्यमांची प्रतिनिधी म्हणून काम करताना पत्रकार नसून मार्केटिंग करणारी व्यक्ती म्हणूनच वावरत होते कारण माझ्या प्रत्येक बातमीसाठी मला मार्केटिंग करणे अपरिहार्य झाले होते. उच्च न्यायालयातील गोळीबार आणि हिंसाचार या बातमीपेक्षा बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात, ही बातमी राष्ट्रीय माध्यमांना अधिक महत्त्वाची वाटत होती', असे उदाहरण धन्या यांनी दिले. "राष्ट्रीय माध्यमांचा हा दुजाभाव अनुभवल्यानंतर मी स्वतःच्या माध्यमाकडे वळले", असे त्या म्हणाल्या.
"राष्ट्रीय माध्यमे दिल्लीशिवाय इतरत्र घडणार्या महत्त्वाच्या घटना दुर्लक्षित करतात. एखादे हॅपनिंग अनावश्यक मोठे करून दाखवताना, वास्तवातील अनेक महत्त्वाचे विषय, घटना, अन्याय बाजूला ठेवले जातात. जम्मूकाश्मीर, मणिपूर या ठिकाणी नेमके काय सुरू आहे, याची माहिती महिनोंमहिने देशाच्या अन्य भागात समजत नाही. चुकीची माहिती आणि जाणीवपूर्वक पूर्वग्रहदूषित माहितीचा प्रसार, हे प्रकार वारंवार घडतात. माध्यमे विशिष्ट राजकीय नेते, पक्ष अथवा उद्योगसमूहांच्या मालकीची असल्याने ते ते प्रभाव अपरिहार्यपणे माध्यमांच्या वृत्तांकनात प्रतिबिंबित होतात. डिजिटल माध्यमांचा प्रसार मोठा असला तरी त्यांच्यावरील शासकीय नियंत्रण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय डिजिटल माध्यमांवर सरकार बंदी आणू शकते. भारतीय समाजव्यवस्थेचा भाग असणारी जातीयता, हे मोठे संकट माध्यमांनाही ग्रासून टाकत आहे", याचा उल्लेख धन्या राजेंद्रन यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवरही समाजाला धाडसी, परखड पत्रकारितेची आवश्यकता आहे, त्यामुळे नव्या पिढीतील पत्रकारांनी माध्मयांच्या विश्वात अवश्य यावे आणि सकारात्मक, निर्भींड माध्यमकर्मी बनून एक सकारात्मक चित्र तयार करावे, असेही त्या म्हणाल्या.
























