Rain Update: राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक एन्ट्री घेतली असून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तुफान पाऊस होत आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. पुण्यात पावसाची झड कायम आहे. दरम्यान, आता पावसाने राज्यातील पहिला बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील दौंड तालुतक्यात झालेल्या मुसळधार पावसाने दुकानात बसलेल्या 75 वर्षांच्या महिलेच्या अंगावर जून्या बांधकामाची भिंत कोसळून जागीच मृत्यू झालाय. रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी मोठी पडझड होत आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाने पुण्यात राज्यातील पहिला बळी
दौंड शहरात दुकानात बसलेल्या ताराबाई विश्वचंद्र आहिर या 75 वर्षीय महिलेच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. राज्यात पावसाची सुरुवात होताच दौंड शहरात पहिलाच बळी गेला असून, जुन्या बांधकामाची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ताराबाई विश्वचंद आहिर (वय 75) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या दौंड शहरातील एका दुकानात बसलेल्या असताना, अचानक भिंत कोसळली आणि त्यांच्या अंगावर पडली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर भिंत जुन्या बांधकामाची होती. अचानक झालेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पुण्यात पावसाने दाणादाण उडाली
बारामती आणि इंदापूर तालुक्यात कारा आणि नीरा नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गाचे काही भाग काही काळ पाण्याखाली गेले होते, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, बारामतीमध्ये सुमारे 150आणि इंदापूरमध्ये 70हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याखाली जाणाऱ्या अनेक गावांशी रस्ते संपर्क तुटला आहे, ज्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) स्थलांतरितांना मदत करण्यासाठी दोन पथके तैनात केली. स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफ कर्मचाऱ्यांनी बचाव कार्यात समन्वय साधला आणि बारामतीमध्ये आठ ठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या निवार्यांमध्ये बाधित रहिवाशांना हलवले. सुरुवातीला बारामतीमध्ये सात आणि इंदापूरमध्ये दोघांना अडकल्याचे वृत्त होते परंतु त्यांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले. त्यानंतर, नीरा नदीने आपला मार्ग बदलल्यानंतर अडकलेल्या आणखी सहा जणांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ पथक सोलापूर जिल्ह्यातील मार्कड वस्ती येथे रवाना करण्यात आले. बचाव कार्य सुरूच आहे.
हेही वाचा: