Pune Dam: धरणातून पाणी सोडण्यापूर्वी दोन तास आधी पुणेकरांना वॉर्निंग मिळणार; सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडमध्ये
Pune Dam: यंदा मान्सून लवकर आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुणे: राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अशातच मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर आता मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान राज्यातील पावसाची परिस्थिती पाहता पुणे (Pune News) जिल्ह्यात पावसाच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. धरणातून विसर्ग करताना दोन तास अगोदर नागरिकांना सूचना मिळणार असल्याची माहिती आहे. (Pune News) पुण्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा इशारा यंत्रणा भोंग्याच्या स्वरूपात पाणी शिरण्याचा धोका असलेल्या ठिकाणी कायमस्वरुपी बसवावी. त्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षाने नागरिकांना द्यावी, अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत.
यंदा मान्सून लवकर आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभागाकडून पूरस्थितीमध्ये नदीमध्ये धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर शहरातील कोणकोणत्या भागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, याची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे सिंहगड रोडवर आलेल्या अनपेक्षित पुराच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा प्रशासनाने वेळेवर सूचना आणि पायाभूत सुविधांच्या तयारीवर भर देत तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जलसंपदा विभागाला कोणत्याही धरणातून पाणी सोडण्याच्या किमान दोन तास आधी आगाऊ सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून नागरी संस्था आणि आपत्कालीन यंत्रणा वेळेत सर्व गोष्टींची मदत पुरवली जाईल.
मागील वर्षी घरांमध्ये शिरलं होतं पाणी
गेल्या वर्षी पुण्यामध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या सर्व घरांना त्याचा मोठा फटका बसला होता. घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. त्यानंतर आता प्रशासन ॲलर्ट मोडमध्ये आलं असून यंदा सर्व खबरदारी घेतली जात आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात तीन बळी
पुणे जिल्ह्यात पावसामुळे तीन बळी गेले आहे. कर्वेनगर भागामध्ये झाड कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे तर खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे राज्य आपत्ती विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विशेषतः डोंगरी आणि नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केलं आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत पावसाचे चार बळी गेले आहे. पुणे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर विरारमध्ये एक जण दगावला आहे.






















