पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाची पुणे पोलिस बाल निरिक्षण गृहात जाऊन चौकशी करणार आहेत. चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाकडे अर्ज केला आहे. चौकशीची परवानगी मिळताच पोलीस बाल निरिक्षण गृहात जाऊन चौकशी करणार आहेत. यावेळी या मुलाचे पालक किंवा वकील उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे चौकशीवेळी कोण उपस्थित राहणार याचीही चर्चा आहे. या मुलाची बाल निरिक्षण गृहातील कोठडी संपत असल्याने त्यापूर्वीच ही चौकशी करण्यात येणार आहे. 


ते रक्ताचे नमूने अल्पवयीन मुलाच्या आईचे नव्हेत 


दरम्यान, अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकल्यानंतर अन्य कोणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मुलाच्या आईनेच ते रक्त दिल्याची चर्चा रंगली असताना रक्ताच्या नमुन्यांचा प्राप्त झालेला अहवाल व ते नमुन्यांसाठी दिलेले रक्त बाळाच्या आईचे नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली. कारण पोलिसांनी नंतर काढलेल्या रक्ताच्या डीएनएशी आईच्या रक्ताचे नमुने जुळले असते. 19 मे रोजी मध्यरात्री घडलेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणात विशाल अग्रवालसह त्याच्या वडिलांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. मद्य पुरवणाऱ्या पब चालकासह मॅनेजरलादेखील अटक झाली आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांचेही निलंबन करण्यात आलं आहे. 


दोन अल्पवयीन मित्रांचे सुद्धा रक्ताचे नमुने बदलण्यात आले


दरम्यान अल्पवयीन पोराचे रक्ताचे सॅम्पल बदलण्यात आल्यानंतर त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांचे सुद्धा रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे या तीन अल्पवयीन मुलांचे जे रक्तगट आहेत त्याच रक्तगटाची इतर तीन जण बोलावण्यात आले होते. त्यामधील एक महिला आणि दोन पुरुष होती अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे डॉक्टर श्रीहरी हळनोर हा कर्तव्यावर असताना हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रक्ताचे नमुने अन्य कोणी दिले असल्याने आता ते कोण याची चर्चा सुद्धा रंगली आहे. 


अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन मित्रांना ससून रुग्णालयामध्ये अपघाताच्या दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. त्या तिघांचे रक्त सॅम्पल घेण्यात आली होते. मात्र, त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी न देता इतर तीन व्यक्तींचे नमुने देण्यात आले होते. मात्र पुणे पोलिसांना शंका आल्याने दुसऱ्या सरकारी रुग्णालयात सॅम्पल घेऊन चाचणी केल्यामुळे हा भांडाफोड समोर आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या