Pune Porsche Accident : रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचा परवाना रद्द, पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई
Pune Porsche Accident Case : पुण्यातील बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवली आणि दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणी ससूनमधील डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलले होते.

पुणे : पोर्शे अपघात प्रकरणात (Porsche Accident Case) रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या वर्षी मे महिन्यात पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एक अपघात झाला होता. दारुच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवली आणि दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणात आरोपी बड्या बापाचा पोरगा होता. त्यामुळे ससून रुग्णालयात डॉक्टरांना पैसे देऊन त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणात मुलाच्या रक्ताच्या ठिकाणी आईच्या रक्ताचे सॅम्पल बदलण्यात आले होते.
डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यावर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती. आता त्यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने कारवाई केली आहे.
Porsche Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरण काय?
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 19 मे 2024 च्या मध्यरात्री पबमधून पार्टी करून परत जात असताना अल्पवयीन कार चालकाने भरधाव वेगात कार चालवत एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.
या अपघातास कारणीभूत असलेल्या बड्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राजकीय हस्तक्षेप आणि पैशाचा वापर करून अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडील, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल याच्या मुलाचे नाव समोर आले होते.
आरोपी अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहण्याचे आदेश दिले त्यानंतर पुणेकरांनी संताप व्यक्त केला होता. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यावर आणि त्याला मिळालेली शिक्षा पाहून सर्वांनाच राग अनावर झाला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणात कारवाई सुरू केली.


















