पुणे :  पुणे ग्रामीण पोलिसांनी पालखी सोहळ्या दरम्यान आकाशात उडणाऱ्या ड्रोनवर कारवाई केली आहे. पालखी सोहळ्या दरम्यान ड्रोन वापरण्यास बंदी केली असूनसुद्धा अनेकांकडून ड्रोनचा सर्रास वापर होताना दिसत आहे. अशातच आता पुणे ग्रामीण पोलिसांनी "अँटी ड्रोन गन" चा वापर करुन ड्रोन खाली उतरवले. ड्रोन उडणाऱ्या तरुणांवर सुद्धा आता ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांकडे 2 अँटी ड्रोन गन

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने काल दिवे घाट लीलयापार केला. हेच विहंगम दृश्य टिपण्यासाठी आणि त्याच्या रील्स करण्यासाठी अनेक तरुणांनी ड्रोनचा वापर केला होता. मात्र ग्रामीण पोलिसांकडे 2 अँटी ड्रोन गन आहेत, त्याचाच वापर करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी माध्यमांची संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून काही अंतरावर ड्रोन पडल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ड्रोन उडवणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश काढले होते.

ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत लाख वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून मार्गस्थ झाली आहे. दोन दिवसा पुणेकरांनी आणि आजूबाजूच्या भागातून आलेल्या भाविकांनी पालख्यांचं दर्शन घेतलं. यानंतर दोन्ही पालख्या आता पुण्याहून निघाल्या आहेत. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा सासवड येथे असणार आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा लोणी काळभोर येथे असणार आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. विठुनामाचा ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत लाख वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. दरम्यान, या वारीच्या काळात पोलिस प्रशासन देखील सतर्क आहे. कोणत्याही प्रकारे अनुचीत किंवा चुकीचा प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन सज्ज आहे. अशातच काहीजण ड्रोनच्या माध्यमातून पालखी सोहळा चित्रीत करत आहेत. असे ड्रोनने शूट करण्यास बंदी घालण्यात आली आहे, तरीदेखील काहीजण शूट करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडे 2 अँटी ड्रोन गन आहेत, त्याचाच वापर करत पोलिसांनी दोन ड्रोनवर कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ashadhi Wari 2025 : यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही; टोलमाफीचे स्टिकर्स मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय?