पुणे : सॅल्यूट, पोलीस बँड, चकाचक पोलीस स्टेशन, रेड कार्पेट आणि ड्रोन शूट… असा सगळा तामझाम करून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. पुणे शहरातील पुणे येथील परिमंडळ १ (झोन वन) मध्ये झालेल्या या स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून शहरात त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Pune Police)
पुणे पोलीस आयुक्त वार्षिक तपासणीसाठी परिमंडळ १ च्या कार्यालयात येणार असल्याने पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. कार्यालयासमोर रेड कार्पेट टाकण्यात आला, व्हिडिओ शूटसाठी कॅमेरे लावण्यात आले आणि स्वागतासाठी पोलीस बँडही सज्ज ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे सकाळी सात वाजताच परिमंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण स्टाफ सकाळीच हजर राहून आयुक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता.
आयुक्त कार्यालयात दाखल होत असताना काही वेळ वाहतूकही थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेड कार्पेट, ड्रोन शूट आणि पोलीस बँड या सगळ्या तामझामामुळे कार्यक्रमाची चर्चा अधिकच रंगताना दिसत आहे. मात्र, गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीसाठी एवढ्या मोठ्या स्वागत सोहळ्याची खरंच गरज होती का, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या बैठकीत परिसरातील गुंडगिरी, ड्रग तस्करी, बुधवार पेठ (Budhwar Peth) येथील बांगलादेशी महिलांबाबतच्या कारवाया, बेकायदेशीररीत्या राहणारे बांगलादेशी नागरिक आणि शहरातील वाहतूक कोंडी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी. मात्र या सर्व प्रश्नांपेक्षा आयुक्तांच्या स्वागताचा व्हिडिओ आणि त्यातील तामझामच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कारवायांचे कौतुक… पण चर्चेत स्वागतच
काही दिवसांपूर्वी परिमंडळ १ ने बुधवार पेठ परिसरात बांगलादेशी महिलांविरोधात सात कारवाया केल्या होत्या. या कारवाईची शहरात मोठी चर्चा झाली आणि पोलिसांच्या कामाचं कौतुकही करण्यात आलं. आयुक्तांनीही या कारवाईनंतर परिमंडळ १ ला भेट दिली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या कामगिरीपेक्षा त्यांच्या स्वागताचा व्हिडिओच आता जास्त चर्चेत आला आहे.
गुन्हेगारीचा आढावा काय सांगतो?
परिमंडळ १ मधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असता 2025 च्या तुलनेत 2026 मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत काही गुन्ह्यांमध्ये घट तर काही गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
जबरी चोरी: यंदा १२ गुन्हे दाखल, ६ उघड; मागील वर्षी १४ दाखल, १० उघड.
घरफोडी: दिवसाच्या ५ दाखल (२ उघड) आणि रात्रीच्या १ दाखल (३ उघड); मागील वर्षाच्या तुलनेत कमी.
एकूण चोरी: यंदा ५७ दाखल, १३ उघड; मागील वर्षी ६२ दाखल, ३२ उघड.
वाहन चोरी: यंदा ३७ दाखल, ८ उघड; मागील वर्षी ४६ दाखल, २२ उघड.
फसवणूक: यंदा २२ दाखल, १० उघड; मागील वर्षी ३१ दाखल, २९ उघड.
दंगा: यंदा १५ दाखल आणि सर्व १५ उघड; मागील वर्षी फक्त २ दाखल.
दुखापत: यंदा २० दाखल व सर्व २० उघड; मागील वर्षी २३ दाखल.
एकूणच काही गुन्ह्यांमध्ये घट दिसत असली तरी दंग्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पोलिसांच्या कामकाजावरही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तामझाम की कामगिरी?
गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीपेक्षा आयुक्तांच्या स्वागताचा सोहळाच जास्त चर्चेत आल्याने “तामझाम की कामगिरी?” असा सवाल शहरात उपस्थित होत आहे.
