Pune Police: पुणे पोलिसांकडून नव्याने शस्त्रपरवाने देण्याला ब्रेक; आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले तर 140 अर्ज केले रद्द, हगवणे प्रकरणानंतर माहिती समोर
Pune Police: 2020 ते 2023 या काळात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिल्याचं समोर आल होतं. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर समोर आलेल्या माहितीनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी असलेल्या निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना देताना त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, असा अहवाल पुणे पोलिसांनी दिल्याचं समोर आल्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट शस्त्र परवाना देण्याला ब्रेक लावला आहे. आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले आहेत, तर 140 अर्ज थेट रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच नव्याने परवाना देणं पोलीस आयुक्ताने पूर्णपणे थांबवलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांना पुणे पोलीस आयुक्तालयातून परवाना मिळाला होता. 2022 मध्ये त्याला पिस्तूल परवाना मिळाला होता. निलेश चव्हाणसह हगवणे बंधुंनी संबंधित लोकांनी पोलिसांची दिशाभूल करून परवाना मिळवल्याचे समोर आलं होत. 2020 ते 2023 या काळात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिल्याचं समोर आल होतं. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर समोर आलेल्या माहितीनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.
शस्त्र परवान्याला पोलिस आयुक्तांचा लगाम
या सर्व प्रकरणानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रपरवान्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे, दीड वर्षात परवान्याची मागणी करणाऱ्या लोकांचे तब्बल 404 अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहेत. तर 104 व्यक्तींचे शस्त्र परवाने देखील रद्द केले असून, नव्याने केवळ फक्त 28 अर्जांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये दहा वारसा हक्क आणि नऊ खेळाडूंच्या कोट्यातील व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातील शस्त्र परवाना प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोरता आणत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ शस्त्र परवान्यांची तपासणी मोहीम सुरू केली. या कारवाईत 1 जानेवारी 2024 ते 3 जून 2025 या कालावधीत दाखल झालेल्या 572 अर्जांपैकी केवळ 28 अर्जांना मंजुरी देण्यात आली, तर तब्बल 404 अर्ज नाकारण्यात आले आहेत. याशिवाय, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 43 जणांचे परवाने रद्द करण्यात आले असून, नूतनीकरण न केल्यामुळे आणखी 97 परवाने रद्द करण्यात आले आहेत. एकूण 140 शस्त्र परवाने रद्द किंवा रद्दबातल करण्यात आले आहेत. याशिवाय, काही अर्जदारांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आल्या आहेत.
निलेश चव्हाणने मंत्रालयातून सूत्रं हलवून हवं ते मिळवलंच
निलेश चव्हाण याने 2022 मध्ये पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, पुणे पोलीस आयुक्तालयाकडून तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर निलेश चव्हाणने मंत्रालयात शस्त्र परवाना मिळावा यासाठी अपील केले होते अशी माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी अहवाल सादर केला त्यामध्ये निलेश चव्हाणला 2019 मध्ये वारजे पोलीस ठाण्यात दाखल हाणामारीचा अदखलपात्र गुन्हा, 2019 मधील हिंजवडी पोलीस ठाण्यातील ड्रंक एन्ड ड्राइव्हचा अदखलपात्र गुन्हा आणि वारजे पोलीस ठाण्यात मे 2022 मध्ये दाखल पत्नीच्या छळवणुकीचा गुन्हा यांची माहिती दडवण्यात आली होती. अहवालात ती माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर मंत्रालयातून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यात आला. त्यावेळी अमिताभ गुप्ता हे पुण्याचे पोलीस आयुक्त तर जालींदर सुपेकर हे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते.























