पुणे : पुणे शहरात पीएमटी बसमध्ये वयोवृद्ध महिलांना गराडा घालून हातातील सोन्याच्या बांगड्या व सोनसाखळी लूटणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वयोवृद्ध महिलांच्या हातातील दागिने कटरने कट करून लूटणाऱ्या टोळीतील दोघांसाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्टेशन परिसरात सापळा रचला होता.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत 191 ग्रॅम वजनाचे पाच लाख 53 हजार, 900 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये 9 बांगड्या आणि 1 मोहनमाळेचा समावेश आहे.

जयकुमार विजय धुमाळ ऊर्फ सोन्या आणि  संतोष ऊर्फ बापू अमृत जाधव अशी आरोपींची नाव आहेत. गेल्या काही दिवसात पुणे शहरात पीएमटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या वयस्कर महिलांना हेरुन त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, पाटल्या तसेच गळ्यातील सोनसाखळी आदी दागिन्यांची चोरी वाढली होती.

या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना खबऱ्यामार्फत अशा प्रकारे चोरी करणाऱ्या टोळीतील संशयित चोर हे पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून पोलिसांनी दोघांना अटक केली.