Pune News: वाढदिवशीच नियतीचा क्रूर खेळ, धान्य भरडताना स्कार्फ अडकल्याने महिलेला मृत्यूने गाठलं; पुण्यातील हृदयद्रावक घटना
Pune News: शेतातील धान्यभरड यंत्रात स्कार्फ अडकून झालेल्या अपघातात 41 वर्षीय शुभांगी नीलेश राऊत यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Pune News: पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरंगवडी गावात नशिबाचा क्रूर खेळ पाहायला मिळाला. घरात वाढदिवसाचा आनंद असताना एका भीषण अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतातील धान्यभरड यंत्रात स्कार्फ अडकून झालेल्या अपघातात 41 वर्षीय शुभांगी नीलेश राऊत (Shubhangi Raut) यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
ही घटना शनिवारी (21 फेब्रुवारी) सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. शुभांगी राऊत या कुटुंबीयांसह शेतात वाटाणा आणि मसूर भरडण्याचे काम करत होत्या. त्यावेळी धान्यभरड यंत्र वेगाने सुरू होते. काम करत असताना त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि केस अचानक यंत्रात अडकले. यंत्राचा वेग आणि ओढ इतकी प्रचंड होती की काही क्षणातच त्या यंत्राकडे खेचल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
Pune News: वाढदिवसाचाच दिवस ठरला शेवटचा
घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने त्यांना उपचारासाठी नसरापूर येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही. विशेष म्हणजे, त्याच दिवशी शुभांगी राऊत यांचा 41 वा वाढदिवस होता. घरात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात असताना अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
Pune News: लष्करी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
शुभांगी राऊत या माजी सैनिक रमेशदादा राऊत यांच्या सून तर निवृत्त सैनिक नीलेश राऊत यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर तसेच गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. या प्रकरणाची नोंद राजगड पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आनंदाचा दिवस काही क्षणातच दुःखात बदलल्याने कुरंगवडी आणि परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. गावात शोकाकुल वातावरण पसरले असून अनेकांनी कुटुंबीयांना धीर दिला.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या























