मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 51 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. इंडोनेशियामध्ये आठवडाभराची सुट्टी घालवून परत आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 51 वर्षीय विक्रम भालेराव यांना अटक करण्यात आली आहे. इंडोनेशियातून परतल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांच्या पासपोर्टमध्ये फाटलेली पाने पाहिली आणि त्यांना थांबवून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पुढील तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भालेराव यांनी बँकॉकला केलेल्या चार सहली कुटुंबापासून लपवण्यासाठी त्यांनी मुद्दाम पासपोर्टची पाने फाडल्याचे उघड झाले आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 51 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. इंडोनेशियामध्ये आठवडाभराची सुट्टी घालवून परत आल्यानंतर पुण्याच्या विक्रम भालेराव यांना मुंबई एअरपोर्टवर बेड्या ठोकण्यात आल्या. भालेरावांनी पासपोर्टची पानं फाडल्याचा आरोप आहे. मात्र चौकशीमध्ये त्यांनी भयंकर गोष्ट सांगितली. मागच्या वर्षी त्यांनी बँकॉकला चार वेळा भेट दिली होती. परंतु ही गोष्ट कुटुंबापासून लपवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा दावा केला. मात्र पासपोर्ट कायद्याचे उल्लंघन आणि फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
काय घडलं नेमकं?
इमिग्रेशन तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना भालेराव यांच्या पासपोर्टवर पाने क्रमांक 17/18 आणि 21 ते 26 गायब असल्याचे दिसले. सहाय्यक इमिग्रेशन अधिकारी राजीव कुमार यांनी सहार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. फाटलेल्या पानांवर थायलंडच्या दौऱ्यांचे शिक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पोलिसांची चौकशी आणि भालेराव यांची कबुली
सुरुवातीला भालेराव हे पाने फाडण्यामागचं कारण स्पष्ट करण्यास तयार नव्हते. परंतु विंग इंचार्ज विलास वडनेरे आणि ड्युटी ऑफिसर विजय कुमार यादव यांच्या उपस्थितीत सखोल चौकशी केल्यानंतर, त्यांनी बँकॉकला केलेल्या चार ट्रिप्स कुटुंबापासून लपवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली दिली.
भालेराव यांच्यावर पासपोर्ट ॲक्ट, 1967 अंतर्गत आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पासपोर्टसारख्या महत्वाच्या कागदपत्रांची तोडफोड ही गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी शिक्षा होण्याची शक्यता आहे. खोटं लपवण्यासाठी केलेली चलाखी भालेराव यांना महागात पडली असून, आता पुढील कारवाईत न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.