पुणे: पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी (NCP Party) एकत्र येणार नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) सगळ्यांना महाविकास आघाडी (MVA) म्हणून लढण्याचं सांगितलं असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली आहे. सगळ्यांना महाविकास आघाडी म्हणून लढण्याचं सांगितलं आहे, त्यासाठी तयारी करा म्हणून देखील शरद पवारांनी सांगितलं असल्याचं जगतापांनी म्हटलं आहे.आज प्रशांत जगताप यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमध्ये पुणे शहराचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेखजोखा मांडला, काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर आता पूर्णविराम मिळाला आहे.

Continues below advertisement

Prashant Jagtap Meet Sharad Pawar: महाविकास आघाडी सोबत लढलो तर काय होईल

याबाबत बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी वेळ दिला होता, त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. पुणे महानगरपालिकेत कशी लढत राहील, आपण महाविकास आघाडी सोबत लढलो तर काय होईल, इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल, याचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला आहे. यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की पुण्यात आणि राज्यात आम्ही महानगरपालिकेच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणूनच लढू. शशिकांत शिंदे यांच्याशी देखील शरद पवार बोलले आहेत, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असल्याचं सांगितलं आहे, असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

Prashant Jagtap Meet Sharad Pawar: आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवू

तर पुढे जगताप म्हणाले, सगळ्यांची मते शरद पवारांसमोर मांडली आहेत. शरद पवारांचा किंवा पक्षाचा वेगळा विचार नाही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ, शशिकांत शिंदे हा निर्णय जाहीर करतील. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवू, असंही जगताप पुढे म्हणालेत.

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय समीकरणे तयार होताना दिसून आली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते काही ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याचंही दिसून आलं. अशीच समीकरणे येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीतही पाहायला मिळू शकतात. मात्र, या शक्यतेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी काही दिवसांपूर्वी ठाम विरोध दर्शवला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन असा पवित्रा त्यांनी घेतला होता, त्यानंतर आज प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली यावेळी मोठा हा मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.

NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावरून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराध्यक्षांमध्ये मतभिन्नता

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दोन राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष कडून आढावा घेतला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावरून दोन्ही शहराध्यक्षांमध्ये म्हणजेच पिंपरी चिंचवड आणि पुण्यात विरोधी भूमिकापाहायला मिळाली आहे. पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी भाजपाला रोखण्यासाठी आमच्या स्थानिक परिस्थितीचा विचार करून आम्ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आम्ही एकत्र लढण्यास तयार असल्याचे शरद पवार यांना सांगितला आहे तर प्रशांत जगताप यांनी महाविकास आघाडी म्हणूनच लढले पाहिजे त्यातच पक्षाचे हित असल्याचे म्हटले आहे. मात्र शरद पवार यांनी पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी भाविकाच आघाडी म्हणूनच लढू असा शब्द प्रशांत जगताप यांना दिला. त्यामुळे आता पुणे राष्ट्रवादीत दोन्ही गटांमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहावं लागणार आहे