पुणे : खरेदीला बाहेर पडण्याआधी पुणेकर गाडीच्या पार्किंगचा विचार आधी करतात.  कारण वाहन पार्किंगची पुण्यात मोठी समस्या आहे. पण आता तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनीच खरेदीसाठी येणाऱ्या पुणेकरांच्या वाहन पार्किंग समस्येवर तोडगा काढलाय  वाहन पार्किंगचे पैसे व्यापारी मोजणार आहेत.


पुणे : पुण्यातील लक्ष्मी रोड,  तुळशीबाग या परिसरात खरेदीला जायचे असेल तर प्रत्येकाला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे 'गाडी लावायला जागा कुठे मिळणार? या समस्येवर आता तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि इतर व्यापाऱ्यांनी मिळून पर्याय शोधून काढला आहे. त्यामुळे आता जर तुम्ही तुमची दुचाकी-चारचाकी वाहन घेऊन इथं खरेदीसाठी जाणार असाल तर ऑनलाईन पार्किंग बुक  मोफत  करू शकता. 


पुण्यातील लक्ष्मी रोड, तुळशीबाग या परिसरात कपड्याचे दुकान सोन्याच्या दागिन्यांची दुकाने महिलांच्या ज्वेलरीची दुकान व इतर खरेदीसाठी मोठे बाजारपेठ आहे. त्यामुळे या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी असते आणि वाहन पार्किंग ला लावायची कुठे याचाच प्रश्न भेडसावत असतो. नाहीतर पार्किंग शोधण्यात तासान तास घालवावे लागतात. यासाठी तुळशीबाग व्यापाऱ्यांनी पार्किंग हब’नावाचे अॅप विकसित केले असून, अॅपच्या साह्याने तुळशीबाग व्यापारी असोसिएशनने नागरिकांना घरातूनच ऑनलाइन पार्किंगचा स्लॉट उपलब्ध करून दिला आहे. जोगेश्‍वरी गल्लीतील महालक्ष्मी मेट्रो या सोसायटीची पार्किंग या ॲपद्वारे जोडली गेली असून, या ठिकाणी 200 दुचाकी व 15 चारचाकी पार्क करण्याची व्यवस्था आहे. 



 


या पार्किंग हब ॲपद्वारे  पार्किंग बुक करू शकता आणि त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला पार्किंग उपलब्ध होणार आहे.  पुढील दोन तास तुमच्याकडून पार्किंगसाठी कुठलेही पैसे घेतले जाणार नाही अशी व्यवस्था या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी केली आहे. एवढंच काय तर इथे इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. 


पुणे शहरातील वाहतूक पोलिसांच्या गाड्या या परिसरात नेहमीच फिरत राहतात. कोणीही नो पार्किंगमध्ये जर गाडी लावली तर त्याला 500 ते 1000 इतका दंड तर होतोच शिवाय वाद ही होतात. या परिसरातील असलेल्या शाळा आणि इतर पार्किंग धारकांसोबत करार करुन शनिवारी आणि रविवारी ग्राहकांना त्यांच्या गाड्या पार्क करता येतील, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे पुणेकरांचा त्रास कमी होणारच आहे शिवाय व्यापाऱ्यांचही उत्पन्न वाढेल आणि वाहतूक कोंडीही होणार नाही.