Devendra Fadanvis  Shivshrushti :  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या  (Shivsrushti) संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) हे योग्य व्यक्ती आहेत, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) व्यक्त केलं आहे. आज पुण्यातील आंबेगाव परिसरातील शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्याच्यावेळी फडणवीस बोलत होते.


अमित शाह हे शिवभक्त आहेत. त्यांनी आतापर्यंतचा महाराजांचा इतिहास वाचला आहे. त्यांनी मराठा साम्राज्याच्या विषयाचे अनेक दस्तऐवज प्राप्त करुन या ऐतिहासिक घटना लेखणीबद्ध करुन त्यावर एक पुस्तक लिहित आहेत. त्यामुळे खरे शिवप्रेमी असलेल्या  व्यक्तीकडून हा शिवसृष्टीच्या लोकार्पणाचा सोहळा दिमाखात पार पडत आहे. शाह यांनी शिवाजी महाराजांचे तत्व आपल्या जीवनात साकारले आहेत आणि गृहमंत्री म्हणून महाराजांचं तेज घेऊन काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत ते काम करत आहे, असं ते म्हणाले.


पंतप्रधान मोदीदेखील मोठे शिवभक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील शिवभक्त आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा पंतप्रधान पदासाठी करण्यात आली होती. त्यावेळी ते महाराष्ट्रात आले आणि त्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेतला. त्यांच्याकडून उर्जा घेतली आणि त्यानंतर संपूर्ण भारताचा प्रवास केला. भारतावर आणि भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचं काम मोदींनी केलं. शिवसृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास, त्याचं तेज हे आपल्या पुढच्या पीठीपर्यंत पोहचवण्याचं  कार्य होणार आहे आणि स्वाभिमान तेवत राहावा. आपण आज नेमकं कोणामुळे आहोत हे सगळ्यांना कळायला हवं, यासाठी या शिवसृष्टीची निर्मीती केली आहे, असं ते म्हणाले. 


'शिवसृष्टी प्रकल्प' काय आहे?


'शिवसृष्टी' हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्प्या असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन आणि बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या गड–किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन 'रणांगण', छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही ऐतिहासिक घटना एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभुती देखील मिळणार आहे.