पुणे: पिंपरी चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यशस्वी कधी होणार? गुन्हेगारांवर त्यांचं वचक कधी बसणार? शहरातील वाहनांची तोडफोड कधी थांबणार? छोट्या-मोठ्या लुटमारीच्या घटना अन उगवत्या भाईंकडून धमकवण्याचे प्रकार तरी थांबणार का? या प्रश्नांची उत्तरं शहरवासीयांना भेटत नसल्याची चर्चा आहे. पोलीस स्टेशनच्या पातळीवर या समस्या सुटत नाहीत म्हणून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंनी 'एक्स' या सोशल मिडियावरून व्हर्च्युअली तक्रारी सोडवण्याची वेळ आली. आता तक्रारी ऑनलाईन सोडवाव्या लागणार असतील तर मग पोलीस स्टेशन कशासाठी? असा ही प्रश्न शहरवासीयांना पडलेला आहे. अशातच दापोडी पोलीस स्टेशनमध्ये चक्क सत्य नारायणाची पूजा घालण्यात आल्याचं समोर आलं आहे.

याच पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण झालं. काल (शुक्रवारी) हा लोकार्पण सोहळा पार पडला, तत्पूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी ही पूजा घातल्याचं बोललं जातं आहे. मात्र आता यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुखांनी यावर आक्षेप घेतले आहेत. मुळात पूजा कोणी आणि कुठं घालावी, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. पण शासकीय कार्यालयात अशा पूजा घालणं, हे बेकायदेशीर असल्याचं अंनिसने म्हटलं आहे.

 पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी अशी पूजा घातली असती तर ती त्यांची श्रध्दा मानली गेली असती पण शासकीय कार्यालयात अशी पूजा घालून, पोलीस काय सिद्ध करु पाहतायेत? असा प्रश्न अंनिसने उपस्थित केला आहे. खरं तर समाजात कोणी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं तर त्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दाद मागितली जाते. पण त्याच पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी अशी पूजा घालत असतील तर अंधश्रद्धेविरोधात सर्व सामान्यांनी यांच्याकडे दाद मागितली तर तक्रारदाराला न्याय कसा मिळणार? असा ही प्रश्न अंनिसने उपस्थित केला आहे. बरं याकडे ज्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, ते पोलीस आयुक्त चौबे सध्या शहरवासीयांचे प्रश्न व्हर्च्युअली सोडवत आहेत. मात्र त्यांना आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये नेमकं चाललंय तरी काय? हे व्हर्च्युअली तर दिसणार नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण ते समजून घेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सरप्राईज व्हिजिट करत, पोलीस स्टेशनमध्ये नेमकं चाललंय तरी काय? हे प्रत्यक्षात पाहण्याची गरज आहे. असं झालं तर कदाचित पोलीस आयुक्तांकडे 'एक्स' या सोशल मिडियावर येणाऱ्या तक्रारींचा सूर ही नक्कीच कमी होईल. फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची अन काटेकोर अंमलबजावणीची. सध्या या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे.