पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांना मागे टाकत भाजपने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शहरातील मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात होती. या लढतीत भाजपने 119 जागांवर विजय मिळवत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या पराभवात अजित पवार गटातील अनेक प्रमुख नेत्यांना धक्का बसला आहे. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे तसेच राष्ट्रवादीच्या माजी प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांचा पराभव झाला आहे. निकालानंतर रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यावर समाजमाध्यमांवर तीव्र टीका सुरू असून, या टीकेविरोधात त्यांनी थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
फेक नेरेटिव पसरवणाऱ्या ट्रॉलर्सला माझ्या बाबतीत ...
रूपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून याबाबतचा इशारा दिला आहे. रूपाली पाटील ठोंबरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, "सोशल मीडियावर बंधु,भगिनी,वडील मंडळी तसचे पोर्टल, न्यूज चॅनेल वालो माझ्या बाबतीत संदर्भात जाणीवपूर्वक हेतुपरस्पर फेक नेरेटिव पोस्ट, बदनामीकारक पोस्ट, अश्लील कमेंट कृपया करुच नये. वैचारिक मनभेद असतील ,आपण माहिती घेऊन तपासून खात्री करून मगच व्यक्त व्हावे किंवा पोस्ट करावी. आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी, अश्लील कमेंट करू नये. अन्यथा नाहक आपल्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी लागेल व गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल. त्यामुळे माझी विनंती आहे फेक नेरेटिव पसरवणाऱ्या ट्रॉलर्सला माझ्या बाबतीत कोणतीच चुकीच्या बदनामीच्या पोस्ट करू नये. जाणीवपूर्वक गैरसमज करणाऱ्या पोस्ट करू नये", असा कडक इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.
तर पुढे त्या म्हणाल्या की, "मी व माझी सोशल टीम परिवार ट्रॉलर्सला जशास तसे उतर देण्यास समर्थ आहोतच पण त्यासोबत कडक कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यास तत्पर आहे. त्यामुळे ट्रॉलर्स तो कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो संविधानाने, कायद्याने, घटनेने कायदेशीर कारवाईस पात्र राहील. नो फेक नेरेटिव नो बदनामी पोस्ट, नो अश्लील कमेंट्स, नो अब्रुनुकसान नो समाज भावना दुखावणे. हीच जाहीर नोटीस समजावी", असं देखील रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.(Rupali Patil Thombare)
दोन प्रभागामधून निवडणूक लढवली पण...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून रुपाली पाटील यांनी प्रभाग क्रमांक 25 आणि 26 या दोन प्रभागामधून निवडणूक लढवली होती. या दोनही प्रभागातून रुपाली पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मतमोजणी दरम्यान त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत गोंधळ घातला होता. यावरूनच रुपाली पाटील यांच्यावर टीका होत आहे. अशातच आता रुपाली पाटील यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्या गँगला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
