पुणे: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (मंगळवार, ३० डिसेंबर) हा शेवटचा दिवस आहे. बहुतांश प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार यादी जाहीर न करता उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म (AB Form) दिले जात आहेत. आज मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातही अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी३ वाजेपर्यंत म्हणजे चार तास आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आघाडी युतीचे जागावाटपच काय तर उमेदवार यादीदेखील जाहीर केलेली नाही. निवड झालेल्या उमेदवारांना परस्पर एबी फॉर्मचे (AB Form) वाटपच करण्यात आले. सोमवारी अनेकांना उमेदवारी अर्ज मिळाल्याने संबंधित वॉर्डातील कोणत्या प्रबळ इच्छुकाचा पत्ता कट झाला, हे स्पष्ट झाले आहे. तर या अनुषंगाने पुण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. आज शेवटच्या दिवशी अनेक मोठ्या नावांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.(Pune Mahanagarpalika Election 2026)
Pune NCP: गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी
कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून प्रभाग १० बावधनमधून एबी फॉर्म देण्यात आला आहे. जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत. गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जयश्री मारणे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. गुंड गजा मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.प्रभाग क्रमांक १० मधून जयश्री मारणे यांनी भरला उमेदवारी अर्ज भरला आहे.
Pune NCP: राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकरांची दोन्ही मुलं निवडणुकीच्या रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुलं निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. एकाला भाजपने तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. बापू मानकर भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही पक्षाकडून मुलांना उमेदवारी मिळाल्याने आता दीपक मानकर नेमका राष्ट्रवादीचा प्रचार करणार की भाजपचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Pune NCP: रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांनी रुपाली पाटील यांना एबी फॉर्म दिला आहे. प्रभाग क्रमांक २६ मधून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
