Romance on the rooftop of running car :  पुणे: शहरातील खराडी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला असून, एका प्रेमयुगुलाने भर रस्त्यात धावत्या कारच्या छतावर बसून स्टंटबाजी आणि रोमान्स करत जीव धोक्यात घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Continues below advertisement


मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी घडला. गाडी सरळ मार्गाने जात असताना तरुण आणि तरुणी वाहनाच्या रूफटॉपवर बसून रोमँटिक पोज देत होते. ही कृती पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित झाले. काही सेकंदांचा हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर तो प्रचंड वेगाने व्हायरल झाला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बेजबाबदार वागणुकीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “हे केवळ स्वतःच्या जीवाशी खेळणे नाही, तर इतरांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करणारे आहे,” अशा शब्दांत नागरिकांनी टीका केली. एका चुकीमुळे दोघांना जीव गमवावा लागला असता, असेही मत व्यक्त करण्यात आले.


कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा इतर प्रतिबंधित जागेत स्टंट करणे दंडनीय अपराध आहे. अशा स्टंटबाजीमुळे दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच, स्टंटमुळे इतर कोणाला इजा झाल्यास गुन्हा दाखल होण्याची तरतूद आहे. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे पालन, रस्त्यावरील सुरक्षितता आणि सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या प्रकारांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.


पुण्यात दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे चाळे, काही दिवसांपूर्वीची घटना


काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरील असल्याचं बोललं जातं आहे. एका दुचाकीवर एक तरुणी थेट पेट्रोल टँकवर उलटी बसली आहे आणि विशेष म्हणजे दुचाकीस्वार ही दुचाकी चालवतो. आजू बाजूच्या लोकांनी अनेक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये काढताना त्यांना दिसत आहेत, पण दुनियाची फिकर न करता हे जोडपं त्यांच्या प्रेमात अखंड बुडालं होतं. जाणारे येणारे सर्वजण त्यांच्याकडे पहात होते, मात्र, त्यांनी त्यामध्ये सुधार केला ना त्यांनी त्यांची दुचाकी थांबवली. पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कोणी म्हणतंय की ही अश्लीलता आहे काही जणं तर हे धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं आहे.