पुणे: पुण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि शिवसेनेची (Pune BJP Shivsena) युती जाहीर होणार हे सांगून टाकलं. मात्र आत्तापर्यंत झालेल्या बैठका, चर्चा आणि जागावाटपामध्ये अपेक्षित तोडगा न निघाल्याने शिवसेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी आज सकाळी पक्षातील ७० ते ८० जणांनी फॉर्म भरले आहेत, त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत, उर्वरीत ठिकाणी देखील आज फॉर्म भरले जातील असं सांगितलं, त्यानंतर पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती (Pune BJP Shivsena)तुटली अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पक्षाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली नसल्याचं जाहीर केलं. (Pune BJP Shivsena)
Uday Samant: कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये
कोणत्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली असं चित्र नाही. हे मी पक्षाच्या वतीने स्पष्ट करतोय. पुण्यामध्ये भाजपने नक्कीच एबी फॉर्म दिलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेते मंडळींनी देखील विचार करून फॉर्म दिले आहेत. मात्र अर्ज माघारी घेण्याची तारीख, अर्ज छाननीची तारीख येण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस आहेत. मी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे महायुती तुटली असं काही पदाधिकाऱ्यांनी भावनेच्या भरातून सांगितलं असेल पण मी शिवसेनेच्या वतीने सांगतो की महायुती तुटली असं चित्र महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. काही ठिकाणी कमी कालावधीमुळे किंवा एकमत झालं नसल्यामुळे एबी फॉर्म दिले गेलेले आहेत. काही ठिकाणी दिले गेलेले आहेत. पण काही ठिकाणी दिलेले नाहीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पुण्यासारखं चित्र आहे पण ते देखील आम्ही दोन दिवसांमध्ये दूर करू. २९ महानगरपालिका निवडणुका लागण्याचं पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे नेत्यांना देखील बोलायला वेळ कमी मिळाला होता, आजपासून तीन-चार दिवस वेळ आहे, त्यामुळं कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
Uday Samant: वाटपामध्ये थोडंफार तिकडे इकडं होतं
पुढचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. माझी चंद्रकांत पाटलांशी चर्चा झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा झाली आहे. जी काही चर्चा झाली ती आमच्या पदाधिकाऱ्यांना कळावी यासाठी मला एकनाथ शिंदेंनी मला पुण्यात पाठवलं आहे, आम्ही सगळे एकत्र बसून प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर प्रस्ताव मांडू, वाटपामध्ये थोडंफार तिकडे इकडं होतं, आता आम्हाला वाटतंय की शिवसेना जिथे जिंकू शकते अशा ठिकाणी आम्ही एबी फॉर्म दिले आहेत. सर्व बाबींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
