पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं पुण्यातील पक्ष कार्यालय हे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा बळकावून बांधण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला. त्याचबरोबर संस्थेच्या जागेवर आलिशान इमारत उभारून त्यातून तीनशे कोटी रुपये कमवल्याचा कुंभार यांनी दावा केला. ज्या कल्पवृक्ष कंपनीने ही इमारत उभारलीय ती कंपनी पार्थ पवारांशी संबंधित आहे असा कुंभार यांचा आरोप आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आलिशान पक्ष कार्यालयाचं उदघाटन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट 2024 रोजी पार पडलं. त्यानंतर अजित पवारांच्या पत्रकार परिषदा असतील किंवा पक्षाचे इतर कार्यक्रम याच कार्यालयात पार पडतायत.
DSTA संस्थेची जागा बळकावल्याचा आरोप
राष्ट्रवादीचं हे कार्यालय अनंता वन या इमारतीचा भाग आहे. अनंता वन या इमारतीच्या तळ मजल्यावर राष्ट्रवादीचं कार्यालय आहे, जिथे जाण्यासाठी मधोमध गेट आहे. तर वरच्या मजल्यावर असलेल्या ऑफिसेसमध्ये जाण्यासाठी डाव्या बाजूला स्वतंत्र गेट करण्यात आलं आहे. कल्पवृक्ष प्लँटेशन या कंपनीकडून ही इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, हे सर्व डेक्कन शुगर्स टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा बळकावून केल्याचा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप आहे.
महाराष्ट्रात साखर उद्योगाची पायाभरणी शेठ लालचंद हिराचंद आणि वालचंद हिराचंद यांनी केली. 1933 साली रावळगाव आणि वालचंद नगर या ठिकाणी साखर कारखाने त्यांनी सुरु केली. मात्र हा साखर उद्योग काळाच्या कसोटीवर टिकायचा असेल तर साखर उद्योगातील नवं नवीन तंत्रज्ञान देखील या उद्योगाने आत्मसात करायला हवं हे दुरदृष्टी असलेल्या लालचंद हिराचंद यांनी ओळखलं.
त्याकाळी साखर उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान ब्रिटिश आणि युरोपियन देशांच्या तयात होतं. त्या तंत्रज्ञान आणि संशोधनात भारत स्वावलंबी झाला पाहिजे हे ओळखून लालचंद हिराचंद यांनी पुण्यातील शिवाजी नगर भागात 1936 मध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची स्थापना केली. जिथे पुण्यातील शिवाजी नगर बस स्टँड होतं आणि जिथे आता शिवाजी नगर मेट्रो स्टेशन आहे, तिथली तीस हजार हजार स्क्वेअर फूट जागा या संस्थेच्या मालकीची झाली. त्यापैकी पुढच्या बाजूला असलेल्या जागेवर संस्थेची इमारत उभी राहिली तर पाठीमागची तेवढीच जागा मोकळी ठेवण्यात आली.
DSTAच्या जागेसाठी पद्धतशीर प्रयत्न
वालचंद हिराचंद हे 1936 पासून 1950 पर्यंत या संस्थेचे अध्यक्ष राहिले. 1966 साली शिवाजी नगरच्या समोरच्या भागातील जागेवर संस्थेकडून नवीन इमारत बांधण्यात आली, ज्याचं उदघाटन त्यावेळचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं. त्यानंतर या संस्थेकडून पाठीमागच्या मोकळ्या जागेत 2011 मध्ये आणखी एक इमारत बांधण्यात आली, ज्याचं उदघाटन त्यावेळचे कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र 2015 पासून डीएसटीएची ही जागा मिळवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न झाले.
आधी संस्थेच्या विश्वस्तांकडून कल्पवृक्ष या कंपनीला समोरच्या बाजूला असलेल्या तीस हजार स्क्वेअर फूट जागेपैकी पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा साठ वर्षांच्या भाडेकराराने धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने देण्यात आली. संस्था आर्थिक अडचणीत असल्याने हा व्यवहार केल्याचं आणि संस्थेला त्यातून काही कोटी रुपये मिळाल्याचं सांगण्यात आलं.
कल्पवृक्ष कंपनीने तीनशे कोटी नफा मिळवला
धर्मादाय आयुक्तांचा आदेश भाड्याने देण्याचा म्हणजे लीज डिडचा होता. प्रत्यक्षात मात्र कल्पवृक्ष कंपनीने या जागेवर 13 माजली इमारत उभारली. ज्यातून 63 हजार स्क्वेअर फूट कमर्शियल जागा त्याठिकाणी निर्माण झाली. ही जागा विकून कल्पवृक्ष कंपनीने तीनशे कोटी नफा मिळवल्याचा कुंभार यांचा आरोप आहे .
या कल्पवृक्ष कंपनीला पार्थ पवार यांनी पाच कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचं कंपनीने आय टी डिपार्टमेंटला सादर केलल्या कागदपत्रांमध्ये नमूद आहे. त्याचबरोबर कल्पवृक्ष कंपनीने जागेचा हा व्यवहार करण्यासाठी जय साहिल प्रधानाला पॉवर ऑफ अॅटर्नी दिली होती तो साहिल प्रधान मुंढवा जमीन घोटाळ्यात देखील आहे.
अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यात मुंढवा जमिनीचा जो व्यवहार झाला त्यामध्ये साहिल प्रधान हा साक्षीदा होता. त्याचबरोबर काळवृक्ष कंपनीचे संचालक आणि सुनेत्रा पवार यांनी इतर अनेक कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम केलंय.
या सगळ्याबाबत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातील पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून माहिती देण्यात आली नाही. तर डीएसटी चे विद्यमान अध्यक्ष सोहन शिरगावकर यांनी देखील माहिती देण्यास नकार दिला. मात्र शिरगावकर यांनी फोनवरून जी माहिती दिली ती देखील खोटी असल्याचं कागदपत्रांमधून आढळून आलंय .
सध्या डीएसटीएचे कार्यालय या अनंता वन इमारतीच्या मागच्या बाजूला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1966 साली बसवण्यात आलेली इमारतीची कोनशिला या 2011 साली बांधण्यात आलेल्या इमारतीत बसवण्यात आली. पण सध्या इथं सिक्युरिटी गार्डच केबिन आहे. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या वाढीत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या डीएसटीए च्या इमारतीला अवकळा प्राप्त झालीय. तर अनंता वन या आलिशान इमारतीत अनेक कार्यालय सुरु झाली आहेत .
पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यात करार होऊन अमेडिया कंपनीला तेजवाणीकडून पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आली. त्या व्यवहारामध्ये साहिल प्रधान हा साक्षीदार आहे. तशी नोंद व्यवहारांच्या कागदपत्रांमध्ये आहे. त्याच साहिल प्रधानला डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीकडून कल्पवृक्ष या कंपनीबरोबर व्यवहार करण्यासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आली. कल्पवृक्ष कंपनीतील संचालक हे अशा कंपन्यांचे देखील संचालक राहिलेत ज्यावर सुनेत्रा पवार संचालक होत्या.
ही बातमी वाचा: