Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर अपघातांचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीय. आज ( 8 डिसेंबर) पुन्हा एकदा नवले पुलावर भीषण अपघात झालाय. सकाळी स्कूल बसने पंच कारला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी झाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. 

Continues below advertisement

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलावर सकाळी स्कूल बसचालकाने पुढे जात असलेल्या पंच कारला मागून धडक दिली. या जोरदार धडकेने कारचा मागील भागाचा चक्काचूर झाला होता. या धडकेत कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हा अपघात किरकोळ स्वरूपाचा असला तरी नवले पुलावरील सततच्या दुर्घटनांमुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज असल्याची मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे. 

Continues below advertisement

 

काही दिवसांपूर्वीच 13 नोव्हेंबरला झालेल्या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी चार ते पाच वाहनांच्या साखळी-धडकेत मोठे नुकसान झाले होते. या सर्वांनंतरही नवले पुलावरील अपघातांचा सिलसिला थांबलेला नाही. पुणे शहरातील अपघातप्रवण 'ब्लॅक स्पॉट' म्हणून ओळखल्या गेलेल्या 19 रस्त्यांच्या यादीत नवले पूल हा सर्वात धोकादायक रस्ता राहिलाय. या रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडताना दिसतात. नवले पुलावर सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा परिसर प्रवाशांच्या दृष्टीने जणू ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची भावना अधिकच बळावली आहे. नव्या कात्रज बोगद्याकडून पुलाच्या दिशेने येताना असलेला तीव्र उतार हे बहुतेक दुर्घटनांचे मुख्य कारण मानले जाते. सध्या या मार्गाचा उतार अंदाजे ४.३ टक्क्यांच्या आसपास आहे, ज्यामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित होण्याची शक्यता वाढते.