MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Pune Protest Vivekanand Patil Speech : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या रागात आपण सामील होण्यासाठी आलो आहोत असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीप्रकरणी अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा यासह अनेक मागण्यांसाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या तीन ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनात कोल्हापूरचा विद्यार्थी असलेल्या विवेकानंद पाटील याचे भाषण चांगलंच गाजताना दिसत आहे. आताही या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर विवेकानंद पाटीलने केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली आणि आपण विद्यार्थ्यांच्या रागात सामील असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी विवेकानंद पाटील यांने दमदार भाषण केलं.
पेपर फुटला आणि आमचं आभाळ फाटलं...
राज ठाकरे यांच्यासमोर बोलताना विवेकानंद पाटील म्हणाला की, पेपर फोडून या लोकांनी आपल्या मराठी लोकांवर अन्याय केला आहे. तसं होत असेल तर आमची मराठी मुलं नवनिर्माण कसं घडवणार? अन्न व औषध प्रशासनाचा पेपर फुटला आहे. ग्रुप बी आणि सी चा पेपर फुटला. गेल्या चार पाच वर्षांमध्ये एमपीएससीचे सगळेच पेपर फुटले.
या लोकांनी आमदार फोडले, खासदार फोडले, पक्ष फोडला त्यावेळी आम्हाला काही वाटलं नाही. पण एमपीएससीचा पेपर फुटला आणि आमचं आभाळ फाटलं. त्यामुळे आम्ही राज ठाकरेंना साद घातली. आता आम्हाला न्याय देण्याचं काम व्हावं, अशी मागणी यावेळी विवेकानंद पाटील याने केली.
राज ठाकरे काय म्हणाले?
आंदोलकांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, गेले काही दिवस मी पाहतोय, या आंदोलनाच्या ठिकाणी अनेकजण येत आहेत आणि पाठिंबा देत असल्याचं सांगत आहेत. पण मी आज जो आलोय तो फक्त तुमच्या रागात सामील व्हायला आलोय. आज तुम्हाला आलेला राग हा तात्पुरता असू नये. सरकारी फसवणुकीमुळे आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ कसा जातोय हे माझ्यापेक्षा कुणी चांगलं सांगू शकत नाही. तुमच्याकडे पेपर फुटत आहेत, आमच्याकडे मतं फुटत आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे एकेक वर्ष निघून जातं. आमच्याही आयुष्यातील वर्ष निघून जातंय. पण त्याचा राग काय असतो हे माझ्यासोबत तुम्हालाही समजत आहे.
राज ठाकरे म्हणाले की, "देशात कुणी कुणाचं काही ऐकत नाही. एकाच बाजून मन की बात सुरू आहे. पण तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. आमच्याकडे निवडणूक होते आणि नंतर मत चोरी झाल्याचं समजतं. त्यामध्ये पाच वर्षे जातात. नुसता जाती-पातीचं राजकारण सुरू आहे, लोकांना धार्मिक गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं जात आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. एवढे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याकडे तुम्ही पाहू नका, यासाठी तुम्हाला कोणत्यातरी गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं जातं."
राज ठाकरे म्हणाले की, "सरकार म्हणतंय की 70 हजारांची पदभरती करणार. पण ती होणार नाही, हे खरं आहे. पण नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. आमच्या महाराष्ट्रातल्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्या मराठी मुलांनाच मिळाल्या पाहिजेत. आपण म्हणतोय आरक्षण पाहिजे, पण त्यासाठी सरकारी नोकऱ्या कुठे आहेत? जे काही आहे ते खासगी होत चाललं आहे. खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाही. हे सगळं सरकारी धोरणांमुळे होत आहे. याचं एकमेव कारण म्हणजे निवडणुकीच्या काळात पैसे दिले जातात, दारू दिली जाते. त्यामध्ये वाहत जाणारे लोक असतात. अशातून निवडून आलेल्या लोकांचा गैरसमज जोपर्यंत तुम्ही दूर करत नाहीत तोपर्यंत काही बदलणार नाही."






















