Vasant More Pune:  मनसे नेते वसंत मोरे यांच्या "सावध रहा रुपेश" अशा भाषेत मुलाला धमकी मिळाली आहे. रुपेश वसंत मोरे असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. या धमकीनंतर वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकाराचा तपास करत आहे. रुपेश याच्या गाडीवर धमकीची चिठ्ठी लावण्यात आली होती. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



नेमकं काय घडलं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कात्रज परिसरात भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. या सगळ्या मेळाव्याचं नियोजनाचं काम रुपेश याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये  "सावध रहा रुपेश"  आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर वसंत मोरे यांनी पाहिली. रुपेश फार कोणात नसतो तरी देखील त्याला धमकी आल्याने वसंत मोरेंची चिंता वाढली आहे.



फेसबुक पोस्ट करत दिली वसंत मोरेंनी माहिती
घडलेल्या प्रकारासंर्भात वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली.  मुलगा म्हटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो.आमचेही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही. राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही. गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते, पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललंच पाहिजे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली. त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये "सावध रहा रुपेश" अशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली.तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ? हे का तेच कळत नाही.भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत. तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय. बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप, असं त्यांनी फेसबुक पोस्ट मध्ये लिहिलंय.