पुणे : पुणे म्हाडाच्या घरासाठी यंदा भरपूर प्रमाणात (Pune Mhada) अर्ज प्राप्त झाले आहेत. पुण्यातील 5 हजार 863 घरांसाठी 59 हजार 350 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यंदा पुणेकरांनी म्हाडाच्या घराला भरपूर प्रमाणात पसंती दिल्याचं दिसून येत आहे. त्यासोबत सर्व सामान्य नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असून येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे 1 लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलंय.
सावे म्हणाले, नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सर्वांसाठी घरे' देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार राज्य आणि केंद्र शासन मिळून प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत. पुणे म्हाडाच्या आजच्या सोडतीत उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले. सदनिकांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करुन म्हाडावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी नागरिकांना धन्यवाद दिले. म्हाडाच्यावतीने नागरिकांना 5 लाख 14 हजार घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. म्हाडाची सोडत प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अतिशय पारदर्शक आहे, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
15 हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार
मुंबईतील सुमारे 15 हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध प्रकल्प उभारण्यात येत आहे. आगामी काळातही विविध उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यापुढे घरांची सोडत वर्षातून दोन वेळेस घेण्यासाठी म्हाडानी प्रयत्न करावेत. 20टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अधिकाधिक नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे विभागात विविध गृहनिर्माण योजनेकरीता शासकीय भुखंड उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी गती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना सावे यांनी दिल्या आहेत.
9 लाख परवाडणाऱ्या घरांची निर्मिती
सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घरे उपलब्ध करुन देत त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी म्हाडाच्यावतीने सुमारे 9 लाख परवाडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे. पुणे म्हाडाच्यावतीने विविध उतपन्न गटातील सुमारे 35 हजार सदनिका, 7 हजार 800 भुखंड आणि 755 गाळे वितरीत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत विविध योजनेअंतर्गत 3 हजार 740 सदनिकांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. म्हाडातर्फे 592 भूखंड वितरीत करण्यात आले आहे. जुन्या इमारतींचे पुर्नविकास करण्याची कार्यवाही करण्याच्यादृष्टीने गती देण्याचे प्रस्तावावर कार्यवाही सुरु आहे.
पुणे म्हाडाच्या 5 हजार 863 घरांसाठी 59 हजार 350 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या 403घरांसाठी 1 हजार 724, प्रधानमंत्री आवास योजना 431घरांसाठी 270 , 20टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना 2 हजार 584 घरांसाठी 56 हजार 941 आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (म्हाडा गृहनिर्माण योजना) साठी 2 हजार 445 घरांसाठी 415 अर्ज प्राप्त झाले. सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरही उपलब्ध आहे.
इतर महत्वाची बातमी-