पुणे : राज्यातील झपाट्याने वाढणारं शहर आणि महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून पुणे (Pune) शहराची ओळख आहे. त्यामुळेच, पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने शासनाकडून मोठ-मोठे प्रकल्प पुणे शहरासाठी सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वीच पुण्यातील आणखी एका मेट्रो लाईनचे लोकार्पण करण्यात आले असून पुणेकरांचा प्रवास गतीमान झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे पुणे मेट्रोतील (Metro) प्रवाशांच्या सोयी-सुविधेचा प्रश्न समोर आला आहे. कारण, चक्क मेट्रोमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचं दिसून आलं. आता,  पुणे मेट्रोमध्ये पाणी (Rain) साचल्याच्या व्हायरल व्हिडिओवर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हे ‘पावसाचे पाणी नसून तांत्रिक बिघाड’ असल्याचं प्रशासनाने म्हटलं. 

Continues below advertisement

पुण्यात झालेल्या जोरदार पावसानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मेट्रो कोचच्या आत पाणी साचलेले दिसत आहे. या व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये चर्चा आणि संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणावर पुणे मेट्रोचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार, ही घटना 21 मे 2026 रोजी संध्याकाळी 6.40 वाजता लाइन-2 वरील रामवाडी स्टेशन येथे ट्रेन सेट-5 मध्ये घडली होती. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मेट्रोमधील हे पाणी पावसाचे नव्हते, तर HVAC ड्रेन चोक झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. धुळीमुळे ड्रेनेज पाइपमध्ये अडथळा आल्याने एसीमधून तयार होणारे कंडेन्सेशनचे पाणी बाहेर पडू शकले नाही आणि कोचमध्ये साचले. ट्रेन ऑपरेटरकडून ही बाब तात्काळ रिपोर्ट करण्यात आल्यानंतर संबंधित HVAC युनिट बंद करण्यात आले आणि स्थिती नियंत्रणात आणण्यात आली. प्रशासनाने ही घटना तांत्रिक स्वरूपाची असल्याचे सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

Continues below advertisement

प्रशासनाकडून पावसाळापूर्व कामांना गती

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरीही कोसळल्या आहेत. त्यामुळे, आता स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडूनही पावसाळापूर्व कामांची सुरुवात झाली आहे. त्यातच, पुणे मेट्रोचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेकांनी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर भाष्य केलं. त्यात, आगामी पावसाळ्याचा उल्लेखही करण्यात आला होता. मात्र, आता प्रशासनाने या व्हिडिओवर स्पष्टीकरण देत ती तांत्रिक बाब असल्याचे स्पष्ट केले.