Pune Metro News: पुणे मेट्रोतील करामती अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. काही दिवसांपुर्वी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशनसुद्धा करण्यात आलं होतं. याच सगळ्या करामती आणि पुणे मेट्रोचा होणार उपयोग पाहून पुणे मेट्रोने आता नवी संकल्पना समोर आणली आहे. पुणे मेट्रोत आता नागरीकांना वेगळेवेगळ्या प्रकारचे सोहळे साजरे करता येणार आहे. त्यात वाढदिवस, वर्धापनदिन किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार आहे.
अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, पुणे मेट्रो रेल्वेने खाजगी उत्सवांसाठी एक डबा देण्याची घोषणा केली आहे आणि ज्यांना वाढदिवस, वर्धापनदिन इत्यादी कार्यक्रम साजरे करायचे आहेत त्यांच्यासाठी डब्यात एक फेरी (येणे-येणे) दिली जाईल. हा उपक्रम खुला असेल. दोन्ही मार्गांवर - लाईन 1 (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते फुगेवाडी) आणि लाईन 2 (गरवारे कॉलेज ते वनाज) सुरु असेल. मात्र या सगळ्यांमुळे नियमित प्रवाशांना प्रवासासाठी कोणताही त्रास होणार नाही याची काळजी पुणे मेट्रो प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.
कार्यक्रमासाठी किती खर्च येणार?
या सगळ्या सोहळ्यासाठी पैसे आकारण्यात येणार आहेत. त्यात तीन प्रकारच्या योजना करण्यात येणार आहे. 1-100 लोकांसाठी 5,000 रुपये, 101-150 लोकांसाठी 7,500 रु,151-200 लोकांसाठी रु. 10,000, करांसह हा खर्च येणार आहे.
पुणे मेट्रोतील करामती व्हायरल
पुणे मेट्रोमधील करामतीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. मेट्रो सुरु झाल्यावर त्यात भजन, नाच, गाणी, पुणेरी भांडणं याचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. तीन दिवसात किमान सात लाख पुणेकरांनी या मेट्रोचा प्रवास केला होता. काही दिवसांपुर्वी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमदेखील पार पडला होता. गरवारे ते वनाज हा मार्ग सध्या सुरु करण्यात आला आहे. मेट्रोच्या बाकी टप्प्यांचं काम अजून बाकी आहे. काही परिसरातून मेट्रोचा प्रवास भूयारातून होणार आहे. या सगळ्या भूयाराचं काम पूर्ण झालं आहे. स्वारगेट आणि बुधवार पेठेतील मेट्रोचा भूयारी मार्ग असणार आहे. दोन दिवसांपुर्वीत स्वारगेटस्थानकाजवळ ब्रेक थ्रु झाला. मेट्रोच्या भूयाराचा हा शेवटचा ब्रेक-थ्रु होता.